औरंगाबाद: गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यांच्या याच पराभवाला माजी आमदार हर्षवर्धन जाधव असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांची फाटाफूट झाली आणि आपला पराभव झाला असल्याचा दावा खैरे यांनी केला होता. मात्र आता त्याच हर्षवर्धन जाधव यांनी मोठं वक्तव्य केलं असून, आगामी लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा विजय होणार असल्याचं म्हटले आहे. जाधव यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत आपण कन्नड मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान याचवेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण पुन्हा एकदा निवडून येणार असल्याचे वक्तव्य केल्याचं उल्लेख करत, आता चंद्रकांत खैरे निवडून येणार असल्याचं जाधव म्हणाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जात होते. पण आता त्याच हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?
यावेळी बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत माझं लक्षच नव्हतं. घरगुती वादात मी एवढा अडकलो होतो की, निवडणुकीला वेळ देऊ शकलो नव्हतो. या गृहकलहात मी इतका अडकलो की रायभन जाधव साहेबांनी दिलेली जबाबदारीच मी विसरून गेलो. माझ्या एका मित्राचा महावितरणाच्या चुकीमुळे जीव गेला आणि त्याचे मुलं उघड्यावर आली. त्यामुळे मी गृहकलह-गृहकलह करत बसल्यास आशा घटना घडत राहतील. म्हणून आता आगामी विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. तर इम्तियाज जलील म्हणतात, ते पुन्हा खासदार होतील. मात्र यावेळी चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा औरंगाबादचे खासदार होणार असल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. आपण विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे देखील जाधव म्हणाले.
हर्षवर्धन जाधवांमुळे खैरेंचा पराभव?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात हर्षवर्धन जाधव देखील मैदानात होते. मराठा आरक्षणावरून राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना मतदारांनी भरभरून मतदान केलं. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांची मत फुटली आणि याचाच फायदा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना झाला. खैरे आणि जाधव यांच्या वादात जलील यांना विजय मिळाला होता. त्यामुळे आपल्या पराभवाला हर्षवर्धन जाधवच जबाबदार असल्याचं आरोप खैरे यांनी अनेकदा केला होता.