औरंगाबाद : मंडळी आतापर्यंत आपण अनेक बॅनर पाहिले असतील मध्यंतरी पुण्यात सस्पेन्स बॅनरचा ट्रेंड आला होता. चौकाचौकात कुत्र्या मांजरांचे वाढदिवस असलेले बॅनरही आपलं लक्ष वेधून गेले असतील. दहावीत 35 टक्के पडल्यानंतर गावभर बॅनर लावल्याचेही आपल्याला आठवत असेल पण औरंगाबादमध्ये एक वेगळा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असल्याचं बॅनर लागले आहे.
औरंगाबाद गुलमंडी ही शहराचा मुख्य बाजारपेठ आहे. पुण्यातली मंडई तशी औरंगाबाद गुलमंडी. औरंगाबादेतील असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने गुलमंडीमध्ये खरेदी केली नाही. याच गुलमंडीतलं एक बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बॅनर आहे तीन अपत्य असल्यामुळे 2022 ची महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी आहे असं. याला बॅनर कम जाहिरात म्हटलं तरी चालेल कारण, या व्यक्तिनं संपर्कासाठी नंबरही दिला आहे.
हे बॅनर लावले 35 वर्षीय रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने. रमेश पाटील यांना औरंगाबाद महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक लढवायची आहे. पण नियमामुळे तीन अपत्य असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. त्यासाठीच त्यांनी आता दुसऱ्या पत्नीचा शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी हे बॅनर लावले.
रमेश म्हणतात मी समाजसेवक म्हणून माझ्या घरी नगरसेवक पद हवं
बरं रमेश यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवलेली नाही हे विशेष आहे .पण त्यांच्या मते ते वार्डात गेल्या काही वर्षांपासून काम करतात. अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहेत असा त्यांचा दावा आहे. लोकांची इच्छा आहे की त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उभं रहावं. पण नियमांची आडकठी असल्यामुळे त्यांना उभा राहता येत नाही. ते ज्या भागात राहतात त्या भागातल्या पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी दावा केला आहे . त्यांनी उभ्या केलेल्या मनसेच्या उमेदवाराला चांगली मतं पडली होती असा त्यांचा दावा आहे. नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असली तरी नियम आडवे येतात म्हणून त्यांनी दुसऱ्या बायकोचा शोध सुरू केला आहे.
असं लक्षवेधी बॅनर लावल्यानंतर आम्ही रमेश यांना पत्नीची प्रतिक्रिया घेऊयात असं विचारलं असता त्यांनी त्याला नकार दिला. शहरात लावलेले हे बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरला तर आहेच शिवाय सोशल मीडियावरही बॅनर धुमाकूळ घालते आहे. अशा प्रकारचे बॅनर लावून हा प्रसिद्धीचा स्टंट म्हणा किंवा काही पण त्यांच्या मनात खरोखरच निवडणुकीत उभा राहण्याची इच्छा असल्यामुळे नियमांची आडकाठी आल्यामुळे लावलेला बॅनरची जोरदार चर्चा होतेय हे मात्र नक्की.