औरंगाबाद : बहीण-भावाच्या हत्येच्या घटनेनं औरंगाबाद हादरुन गेलं आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात या दोघांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. मारेकऱ्यांनी घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार पळवले, असल्याचीही माहिती आहे. किरण खंदाडे (18) आणि सौरभ खंदाडे अशी मृत बहीण भावाची नावं आहेत. आई वडील गावी गेल्याने घरात हे दोघे बहीण भाऊच घरी होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बहिण-भावांचे मृतदेह बाथरूममध्ये आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयटीसमोरील अल्फाईन हॉस्पिटलच्या पाठीमागे दोन मजली बंगल्यात लालचंद खंदाडे  भाड्याने राहतात. ते शेतीच्या कामानिमित्त जालना येथे गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी व एक मुलगी हेही गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते. रात्री आठच्या सुमारास लालचंद राजपूत घरी परतले. मात्र वाहनाचा हार्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले तर बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला.

त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, मिना मकवाना, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांच्या हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी सांगितले, की या हत्या दुपारच्या सुमारास झाल्या असून घटना रात्री उघडकीस आली. हत्येप्रकरणी लालचंद खंदाडे यांनी सातारा पोलिसात फिर्याद दिली आहे. दीड किलो सोने, साडेसहा हजार रोख व मुलीचा मोबाईल, अंगठी चोरी गेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळी चार चहाचे कप 

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी चार चहाचे कप आढळले आहेत. यावरून हल्लेखोर हे ओळखीचे असावेत असा अंदाज आहे. किरण आणि सौरभ या दोघांचे गळे चिरलेले आढळून आले. त्यामुळे मोठा रक्‍तस्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झालेला होता. किरणचा गळा चिरण्यापूर्वी तिच्या डोक्यात काही तरी जड वस्तूने जोरदार प्रहार केलेला असल्याचेही आढळून आले  आहे. चोरट्यांकडून पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. दोन्ही मुलांचे आई-वडील गावाला गेले आहेत. दोन्ही मुलेच घरी आहेत, याची चोरट्यांनी आधी पाहणी केली असावी. त्यानंतर संधी साधून चोरटे घरात घुसले असावेत. चोरट्यांना पाहून या भावाबहिणीने प्रतिकाराचा प्रयत्न केला असावा, तेव्हा चोरट्यांनी दोघांचे गळे चिरून हत्या केली आणि मग घरातील सोने, रोख रक्‍कम व मोबाईल चोरून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.