औरंगाबाद शहरातील सोळाशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शिवसेनेने स्थगिती दिली आहे. याशिवाय लोक आम्हाला विचारणा करत आहेत, राज्यात तुम्ही एकत्र नाहीतर औरंगाबाद महानगरपालिकेत कसे? यामुळे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, भाजपाने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असला तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहायला मिळणार हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवत होते. मागील अनेक वर्षे सभागृहात एकत्र बसणारे युतीचे नगरसेवक सर्वसाधरण सभेतही वेगवेगळे बसल्याचं चित्र होतं. मात्र तूर्तास राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - 29
एमआयएम - 25
भाजप - 22
काँग्रेस - 08
राष्ट्रवादी - 04
इतर - 24
एकूण -112
औरंगाबाद की संभाजीनगर शिवसेना-भाजपा आमनेसामने
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद की संभाजीनगर असा प्रश्न ज्या वेळेस उपस्थित व्हायचा त्यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक एकत्र येऊन एमआयएमविरुद्ध उभे ठाकायचे. मात्र आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद की संभाजीनगर या प्रश्नावरुन शिवसेना-भाजपाचे नगरसेवक एकमेकांविरोधात उभे राहिले. या वादाला निमित्त होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरें अभिनंदनाच्या प्रस्तावाचं. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमचे नगरसेवक सेना-भाजपचा हा राडा जागेवर बसून एन्जॉय करत होते.