औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
मी जी भाषा वापरली त्यावर मी ठाम आहे, माझी जर कोणी बदनामी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, की, काही लोकांच्या डोक्यामध्ये खोके आहेत. ज्याच्या ज्याच्या तोंडामध्ये खोके येतात त्यांचं डोकं तपासावं लागेल. काही लोकांना रात्री स्वप्नातही खोकी दिसतात.
काय आहे प्रकरण?
शिर्डीत राष्ट्रवादीचा मेळावा सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, 50 खोक्यांचा राज्यभर प्रसार झाला आहे. या प्रकरणी ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये याचा चांगलाच प्रसार झालाय. ज्या अर्थी आतापर्यंत कोणीही आमदारांनी त्यावर बदनामीची तक्रार केली नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले. ते म्हणाले की, ज्या भाषेत आमच्यावर टीका केली जाईल त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. त्याच्या डोक्यात खोकी भरल्याने त्यांना सगळीकडे दिसतात.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया नाही
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्यावर सुप्रिया सुळे यांनी मात्र संयमी भूमिका घेतली आहे. आपण अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं त्या म्हणाल्या
राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र आक्रमक झाला आहे. येत्या 24 तासांमध्ये अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील घरासमोर आंदोलन सुरू केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे.