औरंगाबाद : मार्च 2019 च्या 12 वी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालणाऱ्या विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षण विभाग यांच्यातील वादात आता विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. याचं कारण आहे शिक्षकांचं उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कार आंदोलन. आपल्या अनुदानासाठी विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांवर बहिष्कार टाकून उत्तर पत्रिका परत पार्सलनं परत पाठवणाऱ्या शिक्षकांनी 1500 रुपये दंड 20 जानेवारीपर्यंत भरावा, जर तो भरला नाही तर संबंधित शिक्षकांच्या महाविद्यालयातील 12 वीच्या विद्यार्थ्यांनी भरलेले फॉर्म रद्द करु अशी तंबी दिली आहे. औरंगाबाद शिक्षण विभागानं दिलेल्या तंबीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी दंड भरला आहे. मात्र जे शिक्षक दंड भरणार नाहीत त्या शिक्षकाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भरलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत असे मंडळाने कळवले आहे.

माहितीनुसार मार्च 2019 च्या 12 वी उत्तरपत्रिका तपासणीवर अनुदानासाठी शिक्षकांनी बहिष्कार घातला होता. उत्तरपत्रिका तपासणी वर बहिष्कार ह्या आंदोलनादरम्यान उत्तरपत्रिका ईपीपी पार्सल परत पाठविल्यामुळे औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने 1500 रुपये प्रति विषय प्रति पार्सल दंड आकारला होता. प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाकडून मंडळाला पार्सल परत आल्यानंतर पुन्हा पार्सल पाठवणे या सर्वांचा खर्च 1500 रुपये दंड म्हणून वसूल करण्याची नोटीस मंडळाने दिली होती. 20 जानेवारी पर्यंत नोटीसला उत्तर नाही दिलं तर ज्या शाळेने पेपर परत पाठवले त्या शाळेचे येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे मुलांचे आवेदनपत्र स्वीकारणार नसल्याचे देखील बोर्डाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस आपण जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे मंडळाने म्हटलं आहे.


मंडळाने नेमकं काय म्हटलंय?
मंडळाने म्हटलं आहे की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2019 च्या मराठी, गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकांचे इपीपी पार्सल आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मूल्यांकनाचे काम करण्याकरता पाठवण्यात आले होते. सदरचे पार्सल आपण न स्वीकारता न तपासता परत मंडळ कार्यालयास पाठवले आहे. सदर काम करण्याकरता लेखी सूचना देऊनही आपण अत्यंत महत्त्वाचे तसेच आपल्या कार्याचा भाग असताना परीक्षेचे गोपनीय व सार्वजनिक हिताच्या कामात महामंडळास सहकार्य केलेले नाही. आपली ही कृती नियम संगत दिसून येत नाही. सदर गोपनीय व अत्यंत महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण केलेला आहे. आपल्याला सदर कृतीमुळे मंडळात पार्सल पाठवण्याचा व परत स्वीकारण्याचा दुप्पट खर्च करावा लागला आहे. तसेच सदर उत्तरपत्रिकांचे पार्सल परत परीक्षकांना तपासणीसाठी देणे वेळेस संबंधितांचा प्रवास, दैनिक भत्ता खर्च लागला आहे. तेव्हा सदरचा नाहक झालेला खर्च प्रति विषय प्रति पार्सल पंधराशे रुपये प्रमाणे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाकडून वसूल करण्यात का येऊ नये. तसेच आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करण्यात येऊ नये. याबाबतचा सविस्तर लेखी खुलासा स्वखर्चाने मंडळास 31 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करण्याबाबत आपल्याला कळवले होते. तथापि आपण पत्राची दखल घेतलेली दिसून येत नाही. आपणास या पत्राद्वारे अंतिम संधी देण्यात येत असून 20 जानेवारी 2020 रोजी सदरचा खुलासा समक्ष मंडळ कार्यालयात हजर राहून सादर न केल्यास सदर प्रकरणी आपणास काहीही म्हणावयाचे नाही असे गृहीत धरून आपल्या महाविद्यालयाची मंडळ मान्यता व फेब्रुवारी 2020 च्या परीक्षेकरता सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस आपण जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.