Ashadhi Wari : आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Wari) राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पहिला मानाचा पालखी सोहळा पंढरीत दाखल झाला आहे.  पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ  उद्या पार पडणार आहे. त्यानंतर  बुधवारी  सर्व संतांच्या पालख्या  पंढरीत दाखल होणार आहेत. या सर्व पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराज आणि संत मुक्ताबाईंच्या  स्वागतासाठी वाखरी येथे जातात. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी. 


राज्यातील सर्व संताचा मेळा पंढरीत येतो. पंढरीत आलेल्या सर्व संताना भेटण्यासाठी  संत नामदेव महाराज आतुर असतात. आपल्या भावंडाना भेटण्यासाठी ते लवकर उठतात आणि भेटीसाठी वाखरीला येतात. सर्व संताना  पाहून ते आनंदून जातात. त्याचेच प्रतीक म्हणून नामदेवांची पालखी पंढरपूरहून वाखरीला आणण्याची प्रथा आहे.  संत नामदेवरायांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ पंढरपूरच आहे. त्यामुळे नामदेवरायांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघत नाही. पंढरपूरला येणाऱ्या सर्व संतांच्या स्वागतासाठी मात्र नामदेवरायांची पालखी वाखरीला संतांना सामोरी जाते. त्यानंतर सर्व संतांसोबत नामदेवांची पालखी पंढरपूरला येते. 


नामदेवांची पालखी सर्व संताच्या स्वागतासाठी वाखरीकडे प्रस्थान 


दशमीला पंढरपूरातून संत नामदेवांची पालखी सर्व संताच्या स्वागतासाठी वाखरीकडे निघते. नामदेवांच्या पालखीसोबत पंढरपुरात आधी पोचलेली संत मुक्ताबाईंची पालखी असते. पंढरपुरातून निघालेला हा पालखी सोहळा वाखरी आणि पंढरपूर यामध्ये असलेल्या विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिराजवळ येतो. या ठिकाणी काही वेळ भजन  होते. संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे चोपदार येऊन स्वागतासाठी आलेल्या नामदेवांच्या पालखीला पंढरपूरकडे येण्याची विनंती करतात. त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पालखी सोहळे पादुकांपाशी आल्यावर त्या त्या  पालख्यांचे या ठिकाणी उभे रिंगण होते . हे सोहळ्यातील शेवटचे रिंगण असते .


वारीचे दोन प्रकार 


वारीमध्ये देखील दोन प्रकार असतात. एक संतांची वारी आणि देवाची वारी असे प्रकार आहेत. संत देवाला भेटायला येतात ती म्हणजे देवाची वारी... आषाढी वारीला देवाची वारी म्हटले जाते. तर कार्तिकी वारीला संताची वारी म्हटले जाते.  कारण सर्व संत आळंदीला  ज्ञानेश्वर माउलींना भेटायला जातात 


वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर


उद्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह अनेक पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखीतळावर येत असून जवळपास 14 ते 15 लाखांचा समाज याठिकाणी जमणार आहे.दोन दिवस हे वारकरी इथे असून 28 जून रोजी सायंकाळी ते पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. दरम्यान वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. इथे 27 आणि 28 जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे.