मुंबई/नाशिक : बाजार समित्यांच्या संपाचा तिढा काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. अडत वसुलीविरोधात नाशिक एपीएमसीतल्या कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना आपले परवाने परत केले आहेत.

 

चांदवडच्या 117 व्यापाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर करत आपले परवाने परत गेले आहेत. तर पिंपळगावच्या बाजारसमितीचे व्यापारीही आज आपले परवाने परत करणार आहेत.

 

त्यामुळे आपल्या मागण्यांसमोर सरकारने झुकावं याकरता आता व्यापाऱ्यांनी संपानंतर राजीनामास्त्र उगारलेलं दिसतंय.

 

पाच दिवसानंतर बाजारपेठ सुरु

व्यापाऱ्यांच्या पाच दिवसांच्या संपानंतर नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा लिलावाला सुरूवात झाली. गेली काही दिवस सुन्न असलेली बाजारपेठ काल व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून गेली होती. सरकारनं भाजीपाला आणि फळ एपीएमसीमधून नियमन मुक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. मात्र सरकारशी वाटाघाटी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला.. संपामुळं शेतकऱ्यांचं बरच नुकसान झालं असलं तरी, यापुढे अडत द्यावी लागणार नसल्यामुळं शेतकरी समाधानी आहेत.

 

कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा संप मागे

 

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला. व्यापाऱ्यांनी अडतसंदर्भातील सरकारचा निर्णय मान्य केला आहे. त्यामुळं उद्यापासून सर्व व्यापारी भाजीपाला आणि फळांच्या लिलावात सहभागी होणार आहेत.

 

गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यानं भाजीपाला आणि फळांचे सौदे ठप्प झाले होते. किरकोळ व्यापारी देखील अडतीच्या मुद्यावरुन सौद्यांमध्ये सहभाग घेत नव्हते. पण, काल सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींसोबतच्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी सरकारचा निर्णय मान्य केला. त्यामुळं गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव आजपासून पुन्हा पूर्ववत होणार आहेत.