Umesh Kolhe Murder Case : अमरावती (Amravati) येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Amravati Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खान हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचा दावा एनआयएने (NIA) विशेष न्यायालयात केला आहे. डॉ युसूफ खान याच्या वकिलाने जामिनासाठी विशेष एनआयए कोर्टात याचिका दाखल केली आहे. या जामिनाला विरोध करताना एनआयएने हा दावा केला.


डॉ. युसूफ हा तबलिगी जमातीचा सदस्य नव्हता सोबतच त्याच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत असा दावा युसुफच्या वकिलांनी केला. तर उमेश कोल्हेंच्या मेसेजचे स्क्रीनशॉट युसुफनेच काढले आणि नुपुर शर्मांना लक्ष्य करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त केलं, असाही दावा एनआयएने कोर्टात केला आहे. 


भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या संदेशाचे उमेश कोल्हे यांचे परिचित असलेले डॉ. युसूफ खान यानेच छायाचित्र घेतले. तसेच नुपूर शर्मा यांना लक्ष्य करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त केले, असा दावाही एनआयएने केला आहे. प्रेषित पैगंबर यांच्या अपमानाचा सूड घेण्याचा प्रयत्न आरोपी करत होते, असेही एनआयएने डॉ. युसूफ खान याच्या जामिनाला विरोध करताना म्हटले आहे. आता या जामीन याचिकेवर 24 तारखेला सुनावणी होणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर 11 जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ मागितली होती.


प्रकरण नेमकं काय?


नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठीच; NIA चा आरोपपत्रात दावा