अमरावती : कोणी जर पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार याच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व आहे. अदानी प्रकरणात जर विरोधी पक्ष जेपीसी स्थापन करण्याची भूमिका घेत असतील तर मी त्याला विरोध करणार नाही, त्यांच्या सोबत असेन असंही शरद पवार म्हणाले. 


वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कर्नाटक निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात ते काही जागा लढवत आहेत, राष्ट्रवादीही काही जागा लढवत आहेत. आमची यादी त्यांना दिली आहे, ते यादी देतील त्यावेळी सविस्तर चर्चा करता येईल. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावतीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज त्यासंबंधित विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जर कोणी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं. आम्ही आमची भूमिका घेऊ. 


राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवरांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी यातून एकप्रकारे अजित पवार आणि इतरांना अप्रत्यक्ष इशाराच दिला असल्याचं राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केलं आहे. 


मी राष्ट्रवादीतच राहणार, अजित पवारांचे स्पष्टीकरण


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामागे पक्षातील 40 आमदार असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर सर्वच पक्षातून प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन यावर स्पष्टीकरण दिलं. आपण शेवटपर्यंत राष्ट्रवादीमध्ये असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल


सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं स्पष्ट केलं होतं.