Threat to Bachu Kadu: अमरावती: आपल्या जीवाला धोका असल्याचं एक पत्र बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं आहे. सखोल चौकशी करावी आणि संबंधित प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून बच्चू कडू यांनी केली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांना निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरुन बच्चू कडू यांना विचारले जातात. त्यानंतर बच्चू कडू यांनी फोन करणाऱ्यांनाच याबाबत जाब विचारला. अपघात वैगरे काहीच झालेला नसताना असे फोन का येतात? अशी विचारणा का केली जातेय? त्यावेळी बच्चू कडूंना अशा धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीनुसार माझ्या जिवीताला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे दिली आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी पत्रातून दिली आहे. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी पत्रातून केली आहे.
दरम्यान, सध्या बच्चू कडू यांना पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीनं संपूर्ण अमरावतीत खळबळ पसरली आहे. बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लॅन तर नाही ना? अशा चर्चाही संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याचं पाहायला मिळतंय.
बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रातील ठळक मुद्दे
"शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोलीत राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत, बच्चू कडूला पाहून घेऊ जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाही तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही बच्चू कडूला पाहून घेऊ", अशा धमक्या येत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलं आहे. "आज मौका देख के, बच्चू कडू को चौका मारेंगे", अशी धमकी येत असल्याचंही बच्चू कडूंनी पत्रात नमूद केलं आहे.