अमरावती: महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन निर्माण झालेला वाद चिघळल्यामुळे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तुफान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांचे शिष्टमंडळ, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. गेल्या तीन दिवसांपासून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. परंतु, तीन दिवस उलटूनही तोडगा न निघाल्यामुळे पांढरी खानमपूर गावातील एका गटाचा संयम सुटला आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, आक्रमक असलेले आंदोलक आणखीनच बिथरले आणि त्यांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याने मारा केला. मात्र, आंदोलक अजूनही आक्रमक मनस्थितीत आहेत. 


नेमका वाद काय?


अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन गावातील दोन गटांमध्ये वाद सुरु होता. गावात ही कमान उभारायची की नाही, यावरुन एकमत होते नव्हते. मात्र, हा निर्णय होण्यापूर्वीच एका गटाने परस्पर कमान उभारली. त्यानंतर या कमानीला नाव काय द्यायचे यावरुन दोन्ही गटांतील वाद विकोपाला गेला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दरबारात होता. परंतु, चार-पाच दिवसांपूर्वी या गावातील एका गट अमरावतीच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर हे सर्वजण अमरावतीहून मंत्रालयाच्या दिशेने जाणार होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. या गावकऱ्यांशी दर्यापूर येथे चर्चा सुरु होती. गेल्या तीन दिवसांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने एका गटाचा रोष उफाळून आला आहे. आज बैठक सुरु होती, तेव्हा बाहेर आंदोलक आक्रमक झाले होते. गावातील शिष्टमंडळ आणि पोलीस अधीक्षकांची बैठक सुरु होती. ही बैठक लांबल्याने आंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांची मागणी मान्य केल्यास गावातील दुसऱ्या गटाचे वेगळे मत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन कोंडीत सापडले आहे. 


आणखी वाचा


स्‍वागत कमानीचा वाद विकोपाला; अनेकांनी सोडले गाव, तोडगा न निघाल्यास थेट गाठणार मुंबई