Amravati MP Office Row: अमरावती : अमरावती (Amravti News) खासदार कार्यालय नेमकं कुणाचं? हा प्रश्न आता चांगलाच तापल्याचं दिसत आहे. अमरावतीचं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सील केलं आहे. आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) या दोघांनीही खासदार कार्यालयावर दावा केला आहे. पण या संपूर्ण प्रकरणात नवनीत राणांचं पत्र चर्चेचा विषय ठरतोय. नवनीत राणांनी अमरावती खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं आणि त्यावेळी लिहिलेल्या पत्रात हे कार्यालय काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना देण्याची विनंती केली आहे. नवनीत राणांच्या पत्रामुळे अमरावतीतील खासदार कार्यालयाच्या वादात नवा ट्वीस्ट आला आहे.
कार्यालय बळवंत वानखेडेंना देण्याची नवनीत राणांची पत्रातून विनंती
खासदार कार्यालय परत करत असल्याचं नवनीत राणा यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं. तसेच, कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंना देण्याती मागणी केली होती. नवनीत राणा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणालेल्या की, "मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंतरावजी वानखडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करते आणि पुढील जिल्हयाच्या यशस्वी विकास कामासाठी शुभेच्छा देते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेच्या कामाकरीता होते. त्यामुळे भविष्यातही नवनिर्वाचित खासदाराच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्व सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची कामं व्हावी या अपेक्षेसह खासदार जनसंपर्क कार्यालयाची चावी मी या पत्रासोबत आपल्याकडे सुपूर्त करत आहे. कृपया आपल्या माध्यमातून खासदार बळवंत वानखडे यांना ही चावी सुपूर्त करावी, ही विनंती करते. आपल्या सहकार्याची अपेक्षा."
अमरावती कार्यालय तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल
नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरणी आतापर्यंत 15 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कार्यालयाचं कुलूप तोडून ते ताब्यात घेतल्याबद्दल आंदोलकावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, 149, 427, 135 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रवीण मनोहर, हरीश मोरे, वैभव वानखडे, योगेश वानखडे, यांच्यासह आणखी 10 काँग्रेस कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ : Amravati MP Office : काँग्रेसने ताब्यात घेतलेल्या खासदार कार्यालयाला पुन्हा कुलूप,प्रकरण काय?
महत्त्वाच्या इतर बातम्या :