Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी (Amravati Division Graduate Constituency) सुरु आहे. अद्याप अंतिम निकाल हाती आलेला नाही. या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजीत पाटील (Ranjit Patil) आणि कॉंग्रेसचे धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांच्यात लढत आहे. दरम्यान, मतमोजणीमध्ये एकूण 8 हजार 735 मतं अवैध ठरली असून, महत्वाची बाब म्हणजे जवळपास 4 हजारांच्यावर मतदारांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे केवळ 2 हा क्रमांक लिहून मतदान केले आहे. या चार हजार अवैध मतांचा फटका भाजप उमेदवार रणजित पाटील यांना बसला आहे. 


मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीचे मतदान नसल्याने ही संपूर्ण अंदाजे 4 हजारांच्यावर मतं अवैध ठरवण्यात आली आहेत. ज्याचा सरळ फटका हा भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना बसला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर  गुरुवारपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पाच जिल्ह्यांत विखुरलेल्या अमरावती विभागासाठी यंदा सुमारे 13.5 टक्के मतदान कमी झाले. त्यामुळे या कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार? याबद्दल तर्क लढवण्यात येत आहे. 


काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे आघाडीवर 


भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी अवैध मतांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली होती. 8 हजार 735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी झाली. ज्यामध्ये 348 मतं वैध झाली. यामध्ये धिरज लिंगाडे यांना 177 मतं मिळाली तर डॉ. रणजित पाटील यांना 145 मतं मिळाली आहेत. अवैध मतांची फेरमोजणी केल्यानंतर डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली आहेत. तर  काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे यांना 43 हजार 517 मते मिळाली आहेत. मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 2 हजार 346 मतांनी आघाडीवर आहेत. 


दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु


मरावती पदवीधर मतदारसंघात एकूण 1 लाख 2 हजार 587 मतदान झाले होते. यातील अवैध मते ही 8 हजार 387 होती. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 47 हजार 101 चा कोटा पूर्ण करावा लागतो. धिरज लिंगाडे यांना हा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 हजार 584 मते आवश्यक आहेत. तर डॉ रणजित पाटील यांना 5 हजार 930 मते कोटा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत. दरम्यान, सध्या दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधरमध्ये रणजीत पाटील की लिंगाडे! घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला?