Amaravati News: अमरावतीमधील (Amaravati) अचलपूर तालुक्यातील परतवाडामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचं गाणं वाजवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परतवाडामध्ये निघालेल्या ईद-ए-मिलादच्या (Eid-E-Milad) मिरवणुकीत एका गटाकडून 'सर तन से जुदा' घोषणा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याविरोधात संतप्त भावना उमटण्यास सुरुवात झाली होती.
ईद-ए-मिलादनिमित्त अमरावतीच्या ग्रामीण भागात मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी डीजेवर धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. परतवाडामधील मिरवणुकीत एक गटाकडून 'सर तन से जुदा'च्या घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला होता. अमरावती पोलिसांनी या घोषणाबाजी प्रकरणात दोघांना अटक केली. शेख राहिल शेख शफीक (28 वर्ष) आणि शेख हसन शेख कादर (वय 52) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्ये प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अमरावतीमधून काहींना अटक केलाी आहे. उमेश कोल्हे यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यांनी तत्कालीन भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन करणारे स्टेट्स व्हॉट्स अॅपवर ठेवले होते. त्यातून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या या हत्येत राज्याबाहेरील व्यक्तींचा सहभाग होता. एनआयएने त्यांनाही अटक केली आहे.
त्याशिवाय, अमरावतीमध्ये त्याआधी काही महिन्यांपूर्वी दोन गटात दंगल उसळली होती. त्यामुळे अमरावतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत काहींना अटक करण्यात आली होती.
तलवारी जप्त
जून महिन्यात अमरावती पोलिसांनी 29 तलवारी जप्त केल्या होत्या. अॅमेझॉन कंपनीचा अनडीलीव्हर्ड स्टॉक तसेच शिल्लक माल हा लिलाव करून इतर कंपन्यांना विकला जातो. पंजाबच्या भटिंडा येथील ब्रँड कॅन्सल या कंपनीने असाच माल खरेदी करून मध्य प्रदेशातील आरआरसी नामक कंपनीला विकला. त्यानंतर या आरआरसी कंपनीकडून अमरावतीच्या लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन नामक कंपनीने काही माल मागविला ज्यात तब्बल 29 तलवारी निघाल्या. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या 29 तलवारींची एकूण किंमत जवळपास एक लाख 45 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.