Amravati News अमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर 20 आणि 21 फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.


त्यानंतर यांचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी या विषयी तक्रार दाखल करत हा प्रश्न लावून धरला होता. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.


मृद व जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया परीक्षा रद्द


अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर मृद आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी परीक्षा केंद्रांवर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता. मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियंता पदाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यात 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते. तर सदर भरती प्रक्रिया ही टीसीएस मार्फत घेण्यात आली होती.


मात्र या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या करिता गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेत आपली मागणी लावून धरली होती, सोबतच संबंधित विभागाला अनेक तक्रारी देखील दिल्या होत्या. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले आहे. 


परीक्षा नवी, पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच- विजय वडेट्टीवार 


पेपर फुटीच्या या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, WCD चा अमरावती येथील ड्रीमलँड सेंटरवर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच. या सरकार ला अजून काय पुरावे हवेत? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या 


Amravati News: मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला; अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील धक्कादायक प्रकार