पाटणा : भाजपकडून धर्माचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेतून हिंदू-मुस्लीमवर भाष्य केलं होत. ज्यादिवशी मी हिंदू-मुस्लीम भेद करेल, त्यादिवसापासून मी सार्वजनिक जीवनात अयोग्य असल्याचं मोदींनी स्पष्टीकरण दिलं होतं. आता, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं आवाहन केलं आहे. बिहारच्या मधुबनी रॅलीला संबोधित करताना गृहमंत्र्यांनी गोहत्येच्या मुद्द्यावर भाष्य केलं. गोहत्या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना अमित शाह (Amit Shah) यांनी थेट इशारा दिला आहे. तसेच, गोहत्येत (Cowslatter) सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा, असे आवाहनही जनतेला केले आहे.


देशातील पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा वेग आला असून उद्या 17 मे रोजी पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यानंतर, उर्वरीत दोन टप्प्यांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात पाचव्या व अंतिम टप्प्यात 20 मे रोजी मतदान होत आहे. याच निमित्ताने गृहमंत्री अमित शाह देशभरात सभा व रोड शोमधून जनतेला संबोधित करत आहेत. बिहराच्या मधुबनी येथील रॅली जनतेला संबोधित करताना अमित शाह यांनी गोहत्या प्रकरणातील सहभाग्यांना थेट इशाराच दिला आहे. येथील प्रदेशात मोठ्या प्रमाणात गो-हत्या प्रकरणं समोर येत होती. तुम्ही, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा गोहत्या करणाऱ्यांना उल्टे लटकवून सरळ करू, असे आवाहन येथील जनतेला अमित शाह यांनी केलं आहे. 


शाह यांनी आपल्या भाषणातून इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला. इंडिया आघाडीवाले आज म्हणतात की, पीओकेची गोष्ट करु नका, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे. पण, मी त्यांना म्हणतो की, पाकिस्तानच्या अणुबॉम्बला तुम्हीच घाबरुन राहा. मोदींच्या नेतृत्त्वात भारत एवढा मजबूत बनला आहे की, कुणीही अणुबॉम्बला घाबरण्याची गरज नाही. मी आज तुम्हाला सांगतो की, पाकव्याप्त काश्मीर आपलाच आहे, आम्ही तो मिळवणारच, असेही अमित शाह यांनी म्हटलं आहे. 






नरेंद्र मोदी हे देशातील पहिले अती मागास पंतप्रधान आहेत, सन 1950-60 च्या कालावधीत मनोहर लोहिया यांच्या थेअरीनुसार देश चालेल की नाही, अशी चर्चा होत होती. आज मी लोहियाजींना नमन करुन सांगू इच्छितो की, अति मागास असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सर्वात पुढे नेण्याचं काम केलं आहे.