Kerala News : केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. यात एका 49 वर्षीय व्यक्तीचा अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिसमुळे (Amebic Meningoencephalitis) मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यातून पसरणाऱ्या या संसर्गामुळे महिन्याभरात सहा जणांचा बळी गेला असल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) केरळमध्ये अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसमुळे आणखी एक मृत्यू झाला, जो कि या संसर्गामुळे होणारा एका महिन्यातील सहावा मृत्यू होता. कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (एमसीएच) मलप्पुरम येथील एका मूळ रहिवाशाचा यात मृत्यू झालाय. मलप्पुरममधील चेलेम्ब्रा येथील रहिवासी 49 वर्षीय शाजी एका आठवड्याहून अधिक काळ रुग्णालयात उपचार घेत होते. तर सध्या एमसीएचमध्ये नऊ जणांवर या आजारावर उपचार सुरू आहेत. 10 सप्टेंबर रोजी संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या आणखी एका रुग्णावर कोझिकोड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाजी यांना यकृतासंबंधी आजार होता. त्या दरम्यान त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. त्यातच त्यांचा बुधवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. पण त्यांना संक्रमण नेमकं कुठून झालं, याबद्दल अद्याप तरी कोणतीही माहिती अधिकाऱ्यांना मिळालेली नाही.
आरोग्य विभागाकडून डॉक्टरांना विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी
दूषित पाण्यात असलेल्या मुक्त-जिवंत अमीबामुळे होणाऱ्या अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसच्या उपचारांसाठी आरोग्य विभागाने डॉक्टरांना विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की अशा पाण्यात पोहताना किंवा आंघोळ करताना संसर्ग होतो. आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, या वर्षी राज्यात अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसचे एकूण 42 रुग्ण आढळले आहेत, जे परिस्थितीचे गांभीर्य आणि खबरदारीच्या उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित करते.
केरळमध्ये एका महिन्यात 6 जणांचा मृत्यू
दरम्यान, 14 ऑगस्टपासून, कोझिकोड जिल्ह्यातील ओमासेरी येथील रहिवासी असलेल्या अनाया, तीन महिन्यांच्या बाळाचे नाव ओमासेरी, वायनाड येथील रहिवासी रतीश आणि मलप्पुरममधील वंडूर येथील रहिवासी असलेल्या शोभना यांचा मेंदूवर परिणाम करणाऱ्या या प्राणघातक आजारामुळे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मृत्यू झाला. तर 8 सप्टेंबर रोजी, अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसवर उपचार घेत असलेल्या दोन मुलांना बरे झाल्यानंतर कोझिकोड एमसीएचमधून सोडण्यात आले. अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस, गोड्या पाण्यात, तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये आढळणाऱ्या मुक्त-जिवंत अमिबामुळे होणारा एक दुर्मिळ परंतु घातक मेंदूचा संसर्ग आहे. शिवाय तो आता केरळमध्ये सार्वजनिक आरोग्य चिंतेचा विषय बनला आहे.
हेही वाचा