अकोला : नूपुर शर्माच्या समर्थनात समाजमाध्यमावर म्हणजेच व्हॉट्सअपवर 'स्टेट्स' ठेवल्याने अकोल्यातील एका व्यावसायिकाला मारहाण व धमकी देण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केलाय. आज सोमवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून हे आरोप करण्यात आले. याप्रकरणीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात यावा, अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. 


प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे. मात्र, नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने काही दिवसांपूर्वी अमरावती येथील  मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच अकोल्यातही नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॅट्सअॅपवर स्टेटस ठेवल्याने एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा आरप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. याबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. या निवदनावर विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री सूरज भगेवार, महानगर उपाध्यक्ष प्रकाश घोगलिया, प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक हरिओम पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनानुसार काला चबुतरा परिसरातील एका व्यावसायिकाने नूपुर शर्मा यांचे समर्थन करतो असे स्टेट्स ठेवले. मात्र, यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे वाक्य, चित्र नव्हते. तरीही काही युवकांनी त्या व्यावसायिकास त्यांच्या दुकानावर जाऊन मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विहिंपकडून करण्यात आला आहे. 


भीतीपोटी तीन दिवस होते दुकान बंद : 


भीतीपोटी या व्यावसायिकाने तीन दिवस आपलं दुकानही बंद ठेवलं होतं. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली. याप्रकरणी तातडीने पाऊले उचलून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केले आहे. 


या व्यावसायिकाला मारहाण झाली, अशी कुठलेही बाब समोर आली नसून या प्रकरणात तक्रार घेण्यात आली. अन् संबंधित तीन ते चार युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार या युवकांनी व्यवसायिकाला धमकावून पुन्हा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत माफी मागावी, असे सांगितले होते.