Uddhav Thackeray: मंत्री संजय राठोड यांची मतदारसंघातच चौफेर राजकीय नाकेबंदी करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटानं पुढची चाल खेळली आहे. आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा नेते अनिल राठोडांनी मूंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलंय. दिग्रस मतदारसंघात संजय राठोडांना चक्रव्युहात घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले संजय देशमुख आणि महंत सुनिल महाराजांना आपल्या पक्षात प्रवेश दिलाय. आज अनिल राठोडांच्या रूपानं ठाकरेंनी तिसरा 'हूकुमी एक्का' फेकत संजय राठोडांची नाकाबंदी आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात, संजय राठोडांना नामोहरम करणारं उद्धव ठाकरेंचं 'मिशन दिग्रस' काय आहेय? 


संजय राठोड... राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री... ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नावांमधलं एक बडं नाव... संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तब्बल चौथ्यांदा विजयी झालेयेत. मात्र, आधीच्या ठाकरे सरकारमध्ये पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानं संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला होताय. मात्र, राज्यातील एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतर संजय राठोडांनी शिंदेंना साथ दिलीय. अन शिंदेंनी संजय राठोडांना आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनवत त्यांची मंत्रीमंडळात परत 'रिएंट्री' घडवून आणलीय. मात्र, याच संजय राठोडांना आता त्यांच्याच दिग्रस मतदारसंघात घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मतदारसंघातल्या त्यांच्या राजकीय विरोधकांना एकत्र केलंय. त्याचाच भाग म्हणून आज बंजारा समाजाचे वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचे नेते असलेल्या अनिल राठोडांच्या हातात उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलंय. 


कोण आहेत अनिल राठोड?


वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे माजी दिवंगत आमदार गजाधर राठोड यांचे सुपुत्र. 
अनिल राठोड यांचे वडील गजाधर राठोड 1995 मध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले होतेय. 
अनिल राठोड हे महाराष्ट्र विज मंडळाचे माजी शासकीय सदस्य होतेय. 
अनिल राठोड यांचा संजय राठोडांच्या दिग्रस मतदारसंघासह वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील बंजारा मतदारांमध्ये मोठा दबदबा. 


उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना दिग्रसमध्ये घेरण्यासाठी सर्वात आधी प्रवेश दिला तो पोहरादेवीच्या धर्मपीठाचे महंत सुनिल महाराज यांना... बंजारा धर्माचे संस्थापक संत सेवालाल महाराजांच्या कुटूंबातील वंशज असलेल्या सुनिल महाराजांचं बंजारा समाजात मोठं स्थान आहेय. यानंतर ठाकरेंनी दुसरा प्रवेश घडवून आणलाय तो संजय राठोडांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या संजय देशमुखांचा... संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विजयी झालेयेत. संजय देशमुख हे विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या  मंत्रिमंडळात राज्यमंत्रीही राहिलेयेत. संजय देशमुखांनी 2019 च्या निवडणुकीत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून दुसर्या क्रमांकाची 73 हजार 217 मतं घेतलीयेत. संजय राठोड 2019 मध्ये दिग्रसमधून 63 हजार मतांनी विजयी झाले होतेय. 



संजय राठोडांसाठी असं आहेय उद्धव ठाकरेंचं चक्रव्यूह :


मंत्री संजय राठोडांची 'व्होटबँक' असलेल्या बंजारा समाजात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा व्यापक जनाधार वाढविणे. 
यासाठी बंजारा समाजातील ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेणे. 
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी धर्मपीठाची ताकद ठाकरे गटाच्या मागे उभी करण्यासाठी प्रयत्न करणे. 
दिग्रस मतदारसंघातील संजय राठोडांच्या विरोधातील सर्व राजकीय विरोधकांना ठाकरे गटाच्या छताखाली एकत्र आणणे. 


उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांच्यानंतर राज्यातील बंजारा मतं शिवसेनेसोबत रहावीत म्हणून 'व्यापक व्युहरचना' केलीये. यातून संजय राठोडांची हक्काची 'व्होटबँक' असलेल्या बंजारा समाजाला टार्गेट करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहेय. यासोबतच संजय राठोडांच्या सर्व राजकीय विरोधकांना ठाकरे गटाच्या एका छताखाली आणण्याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंनी समोर ठेवलंय. त्यातूनच महंत सुनिल महाराज, संजय देशमुख आणि आता अनिल राठोडांच्या हाती उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलंय. उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवीत येत मोठं शक्तीप्रदर्शन करणारायेत. शिवसेना सोडून गेलेल्या 40 आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच मतदारसंघात चक्रव्यूह तयार करण्याची रणनिती आखलीये. त्यातच संजय राठोडांना नामोहरम करण्यासाठी दिग्रस मतदारसंघासह बंजारा समाजातील आणखी मोठे प्रवेश ठाकरे गटात करण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहेय. उद्धव ठाकरेंचं हे राजकीय चक्रव्युह भेदण्यासाठी संजय राठोड पुढे काय-काय करणार?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.