अकोला : ग्रामीण महाराष्ट्रात तरुणांच्या लग्नाचा (Marriage) प्रश्न गंभीर बनला असून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने वेगळ्याच तणावात ही तरुणाई असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, 8 नोव्हेंबर रोजी अकोला (Akola) दौर्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवारांना (Sharad pawar) एका तरुणाने एक भावनिक पत्र दिले. “माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. मी एकाकीपणामुळे त्रस्त झालो आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला तयार आहे. तिथे काम करून संसार नीट चालवीन, याची मी हमी देतो. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. तुम्ही मला जीवनदान द्याल. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही,” असा आशय या पत्रात होता. आता, तो तरुन एबीपी माझ्याच्या कॅमेऱ्यासमोर आला असून त्याने पुन्हा एकदा आपलं गाऱ्हाणं मांडलं.
अकोल्यातील या लग्नाळू मुलाने पत्रात स्वतःचा मोबाईल नंबर आणि पत्ता दिल्याने शरद पवार व व्यासपीठावरील नेते काही क्षण अवाक् झाले होते. या पत्राची चर्चा अकोल्यातच नव्हे, तर सोशल मीडियावरही जोरदार झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून जिल्हा पदाधिकाऱ्यांना या तरुणाला मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, “आम्हाला या तरुणाला मदत करण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत. लवकरच आम्ही त्याच्यासाठी योग्य वधू संशोधन सुरू करणार आहोत. त्याचे आयुष्य सेटल करण्याची जबाबदारी आमचा पक्ष घेणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
मंगेश बीए पदवीर, शरद पवारांना दिलं पत्र (akola mangesh marriage)
अकोल्यातील मंगेश इंगळे या तरुणाने शरद पवारांना पत्र लिहिलं होतं. वयाच्या 34 व्या वर्षीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. आपण कोणत्याही अटीविना लग्न करण्यास तयार असून माझं लग्न जुळवून द्या, आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही अशी विनंती या तरुणाने शरद पवारांकडे केली होती. पवार साहेबांना एखादं काम म्हटलं की ते काम होतं, म्हणून मी त्यांच्याकडे ते पत्र दिलं. माझी आणि पवार साहेबांची भेट झाली नाही, पण त्यांच्या पीएकडे मी ते पत्र दिलं होतं, असेही त्याने सांगितले. मंगेश हा बीए पदवीधर असून आता एमए करत आहे, तो स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्या घरात आई, दोन भाऊ आणि एक बहिण असं कुटंब असल्याचंही त्यांने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
हेही वाचा
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश