अकोला: राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद आता न्यायालयात पोहोचला असून आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) अब्रुनुकसानीच्या दाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर एक रुपया अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अमोल मिटकरींची कुवत तेवढीच असून जास्त रक्कमेची नोटीस दिली असती तर मिटकरींना काळी कामं करावी लागली असती अशी प्रतिक्रिया शिवा मोहोड यांनी दिली आहे. 


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्याच पक्षातील अकोला युवक जिल्हाध्यक्षावर पाच कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याला शिवा मोहोड यांनीही जशास तसं उत्तर देत एक रुपया अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आमदार मिटकरींनी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने जनमाणसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा नोटीसमध्ये आरोप करण्यात आला आहे. 


शिवा मोहोड यांच्यावर पाच कोटी रुपयांचा दावा 


आमदार अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर तब्बल पाच  कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील नोटीस मिटकरींच्या वकिलांकडून मोहोड यांना बजावण्यात आली आहे. मोहोड यांच्यासह एका वृत्तपत्राला आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल गावंडे यांच्यावरही आमदार मिटकरींनी हा दावा ठोकलाय. 


काय आहे प्रकरण?


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड आणि माजी नगरसेवक विशाल गावंडे यांनी मुर्तिजापूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर 28 ऑगस्ट रोजी मिटकरींवर कमिशनखोरीचे आरोप केले होते. यानंतर आमदार मिटकरींनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला. आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळून लावले होते. 


शिवा मोहोड यांनी आमदार मिटकरींवर महिलांच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आमदार मिटकरी यांनी थेट मोहोड यांच्यावर अब्रूनुसकानीचा दावा ठोकला. तर पुढच्या चार दिवसांत मिटकरींविरोधांतील गंभीर पुरावे सार्वजनिक करणार असल्याचे मोहोड यांनी म्हटले होतं.


कोण आहेत शिवा मोहोड?


शिवा मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अकोला महापालिकेतील माजी सभागृहनेते होते. कौलखेड आणि तुकारामचौक भागात त्यांची मोठी ताकद आहे. शिवा मोहोड यांच्या पत्नी किरण अवताडे यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.