Akola: 'मामा-भाच्या'ची जोडी हा आपला समाजव्यवस्थेतला अतिशय जिव्हाळ्याचा विषय. 'मामा-भाचे' जर एकत्रित आले तर ते इतिहास घडवतात, असंही म्हटलं जातं. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील छोट्याशा शिर्ला गावाने आज संपूर्ण जिल्ह्याला अभिमानाने उंचावलं आहे. या गावातील मामा-भाचा अशा दोघांनीही एकाच वेळी एमपीएससीच्या राज्य सेवा परीक्षेत यश मिळवत वर्ग-1 अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. (Akola News) राजेंद्र घुगे यांनी बारावा क्रमांक, तर त्यांचे भाचे प्रतीक पारवेकर यांनी चौथा क्रमांक मिळवत एमपीएससी परीक्षेत दमदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे दोघेही एससी प्रवर्गातून निवडले गेले आहेत. (MPSC)
संघर्षातून यशाकडचा सोनेरी प्रवास
प्रतीक पारवेकर हा केवळ चार वर्षांचा असताना वडिलांच्या निधनाने अनाथ झाला. आई मालती पारवेकर यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करत मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्य झोकून दिलं. अत्यंत हलाखीतही प्रतीकने पहिल्याच प्रयत्नात क्लास-वन अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं. दुसरीकडे, राजेंद्र घुगे यांनी केवळ सहा महिन्यांचे असतानाच वडिलांना गमावलं. दारिद्र्याच्या छायेत, दोन एकर शेतीतून संघर्ष करत त्यांनीही यशाचं शिखर गाठलं. दोघांच्या पाठीशी कुटुंबातील हेमंत घुगे यांचं प्रेरणादायी पाठबळ कायम राहिलं.
एक डबा, एक ध्येय आणि दोन स्वप्नं
पुण्यात अभ्यासासाठी गेलेल्या या मामा-भाच्याने एकाच डब्यातील जेवण वाटून खाल्लं, मुलाखतीसाठी लागणारा टाय-सूट एकत्र वापरला आणि आर्थिक अडचणींवर मात करत मोठं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचा हा संघर्ष आणि जिद्द आज असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना प्रतीक पारवेकर म्हणाले की, “आज मी वर्ग-1 अधिकारी म्हणून निवड झालो हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान आहे. आईचा त्याग, मामाचं मार्गदर्शन आणि कुटुंबाचा विश्वास यांच्यामुळेच हे शक्य झालं.” तर राजेंद्र घुगे म्हणाले की, “माझ्या बहिणीच्या आणि भावाच्या साथीनं हे यश मिळालं. आता खरी सेवा सुरू होणार आहे. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणं, हाच पुढचा संकल्प आहे.”
गावात जल्लोष, दोघांचं सत्कार सोहळ्याने स्वागत
निकाल लागल्यानंतर शिर्ला गावात दोघांचा सत्कार करण्यात आला. मामा-भाच्याच्या या यशाने संपूर्ण गाव अभिमानाने न्हाऊन निघालं आहे. एकाच डब्यातून जेवण वाटून खाणारे हे दोघे 'मामा-भाचे' आज महाराष्ट्र शासनात वर्ग-1 अधिकारी म्हणून बसणार आणि हीच त्यांच्या संघर्षाची खरी शिदोरी आहे.