Continues below advertisement

अकोला : शरद पवारांना लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणांचं आणखी दुसरं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती आलं आहे. या तरुणाने अकोल्यातील (Akola) राष्ट्रवादीचे नेते तथा विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनाही पत्र लिहिलं होतं. अमोल दादा मला दत्तक घ्या, तुम्ही आपल्याला दत्तक घेतलं तर आपण 'मिटकरी' नाव लावायला तयार असल्याचंही तरुणाने आमदार मिटकरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या तरुणाने अमोल मिटकरी यांना लिहिलेले हे दुसरं पत्रही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनीही संबंधित तरुणाने आपल्याला पत्र लिहल्याची कबुली दिली. तसेच, असे अनेक पत्र येतात, असेही मिटकरी यांनी म्हटले.

अकोल्यातील मंगेश इंगळे या तरुणाने शरद पवारांना आपल्या लग्नाच्या मध्यस्थीसाठी पत्राद्वारे विनंती केली होती. यासंदर्भात 8 नोव्हेंबरला शरद पवार अकोला दौऱ्यावर असताना मंगेश इंगळेंनी शरद पवारांना पत्र दिलं होतं. शरद पवार म्हणतील त्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयार असल्यास मंगेशने पत्रात नमूद केलं होतं. त्यानंतर, पत्र लिहिणाऱ्या मंगेश इंगळे ह्या तरुणाने पत्र कुणाकडे दिले, त्याचं शिक्षण किती, तो काय काम करतो याबाबत एबीपी माझावर माहिती दिली. आता, या मंगेशचं दुसरं पत्र समोर आलं आहे. त्यामध्ये, अमोल मिटकरी यांना पत्र लिहून दत्तक घेण्याची विनंती त्याने केली होती. 21 मे 2025 रोजी त्याने हे पत्र मिटकरींना लिहिल्याचं दिसून येत आहे.

Continues below advertisement

पत्रात नेमकं काय लिहिलं

वरील विषयास अनुसरुन आपल्या सेवेशी विनंती अर्ज सादर करतो की, मी हिंगणा रोड अकोला येथील रहिवाशी असून मी हिन्दु मातंग एससी प्रर्वगाचा समाजाचा आहे. आपण मला शिक्षण, करिअर, संगोपन व माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी दत्तक घेऊन आपल्या परिवारामध्ये समाविष्ट करुन घ्यावे. मला स्व-खुशीने आपल्या परिवाराचा सदस्य व्हायचे आहे. मी कोणाच्याही दबावाखाली न येता पूर्णपणे शुद्धीवर व स्वखुशीने हा निर्णय घेत आहे. याला माझी पूर्णपणे सहमती आहे, अशी मी हमी देतो, तरी भविष्यात आपल्या परिवाराची शिस्त व संस्काराचे काटेकोरपणे पालन करेल. तरी आपण मला आपल्या परिवारामध्ये समाविष्ट करून घ्यावे ही विनंती, असेही त्याने पत्रात म्हटलं आहे.

अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

दरम्यान, आपल्यालाही या तरुणाने पत्र लिहिल्याचा अमोल मिटकरी यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना कबुल केलं. मात्र, असे अनेक पत्र येत असल्याने आपण त्या तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मिटकरी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. 'एबीपी माझा'शी बोलतांना मंगेश इंगळे यांनीही अमोल मिटकरींना पत्र पाठविल्याचे सांगितले होते.

हेही वाचा

34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?