पुणे : आपण आता सरकारमध्ये आहोत. त्यामुळं आपणच काही चुकीचं करायचं नाही. नाहीतर रॉंग साईडने यायचं आणि 'पोलिसांना सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं' हे चालणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज दिली आहे. ते पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.


यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या शैलीत फटकारे लगावले. ते म्हणाले की, आपलं सरकार आलंय म्हणून वाळू माफिया, स्क्रॅप माफिया यांच्यापासून सावधान रहा. आपणच काही चुकीचं करायचं नाही. रॉंग साईडने यायचं आणि 'पोलिसांना सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं' हे चालणार नाही. लोक कुठल्याच नेतृत्वाला गृहीत धरून चालत नाहीत, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांमध्ये एक पंचमांश जागा पुणे जिल्ह्याने दिल्या आहेत. पक्षासाठी काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून महामंडळं देणार आहोत. मागच्या सरकारनं केलेल्या बदलांमुळं त्रास होत असेल तर लक्षात आणून द्या. त्यामध्येही बदल करु, असे ते म्हणाले.

हे ही वाचा -  सध्याचं मंत्रिमंडळ काही काळापुरतं, डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार

यावेळी आमदारांना उद्देशून ते म्हणाले की, नागपूरचे अधिवेशन फक्त सहा दिवसांचं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी सगळे दिवस उपस्थित राहावं. लग्नकार्य करत बसू नका. खासकरून दत्तात्रय भरणे यांना सांगणं आहे, असा टोला त्यांनी लगावला. सरकारचं स्थैर्य, अधिकाऱ्यांमध्ये हा मेसेज जावा की हे सरकार पाच वर्षं टिकणार आहे. यासाठी आमदारांची उपस्थिती गरजेची आहे, असे ते म्हणाले.

पवार म्हणाले की, मी आज्जीचा खूप लाडका होतो. आज्जी त्यांच्या मुलांना बापूसाहेब, आप्पासाहेब असं संबोधायच्या. मी याबद्दल विचारलं तर म्हणाल्या की आपणच आपल्या व्यक्तींना महत्व दिलं तर लोक आपोआप देतात. म्हणून आपल्या लोकांना महत्व दिलंच पाहिजे.

पवार म्हणाले की, धरणं, कालव्यांमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणी सोडण्याचे आदेश मी दिले आहेत. ते सोडणं सुरू होईल, असे ते म्हणाले.