कल्याण : पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी मिसिंगच्या तक्रारीवरुन या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. याप्रकर कल्याणच्या एमएफसी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
राजीव ओमप्रकाश बिडलान असं यातील हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. राजीव हा कल्याणमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करायचा. बेतूरकर पाडा परिसरात असलेल्या एका खानावळीत तो जेवायचा आणि तिथेच राहायचा. त्याच खानावळीत काम करणाऱ्या रुपा जैस्वार या विवाहित महिलेशी त्याचे अनैतिक संबंध जुळले. त्यानंतर रुपा आणि राजीव हे दोघेही कल्याणमधून पळून गेले.
दोन महिने बाहेरगावी राहिल्यानंतर ते रुपाच्या घरी परत आले आणि तिथेच राहू लागले. मात्र अचानक 21 ऑक्टोबर रोजी राजीव हा बेपत्ता झाला, तो सापडलाच नाही. याप्रकरणी राजीवच्या भावाने पोलीस ठाण्यात राजीव हरवल्याची तक्रार दाखल केली होती. राजीवच्या बेपत्ता होण्यामागे असणारी संभाव्य कारणं लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि रुपाचा पती संजीत जैस्वार, पुतण्या उत्तम जैस्वार, सावत्र भाऊ संदीप गौतम आणि त्यांचा मित्र राहुल लोट यांना ताब्यात घेतलं.
या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी राजीव याच्या हत्येची कबूली दिली. आधी त्यांनी राजीवला भरपूर दारु पाजली आणि त्यानंतर रिक्षात बसून फिरवलं. त्यानंतर धारदार शस्त्राने छातीत भोसकून त्याची हत्या केली. मुंबई-नाशिक महामार्गावरील वालशिंद गावालगत त्याचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी राजीवचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हस्तगत केला असून त्यानंतर या चौघांनाही अटक केली आहे. केवळ मिसिंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी लावलेल्या हत्येच्या तपासामुळे पोलिसांचं कौतुक होत आहे.