Beed News : पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी, तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) याने  31 डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणातील पुण्यात सीआयडीला शरण गेले. यादरम्यान कराड ज्या गाडीत सीआयडीला शरण गेले त्या गाडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला आले होते. त्याच गाड्यांच्या ताफ्यात सदरील गाडी असल्याचा आरोप केला गेला. ज्याच्या नावे ही गाडी आहे ते शिवलिंग मोराळे (Shivling Morale) यांनी माध्यमासमोर येऊन याबाबतची स्पष्टता दिली आहे.


अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..'


या आरोपांवर ते म्हणाले की, जे आरोप केले जात आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. मी वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता आहे. मला ज्यावेळी माहित झाले पण मी कराड सरेंडर होणार आहेत त्यावेळी आम्ही पुणे गाठले. मी सीआयडी ऑफिस परिसरात असताना वाल्मिक कराड एका छोट्या गाडीत आले होते. मात्र त्यांनी मला पाहिल्यानंतर त्यांनी मला हात केला आणि त्यांनी मला माझ्या गाडीत सीआयडी ऑफिसला सोडायला सांगितले. त्यांना त्या ठिकाणी सोडले आणि मी निघून आलो, असल्याचं मोराळे यांनी स्पष्ट केले आहे. 


देशद्रोहाचा गुन्हा असलेले कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांच्या सोबत- शिवलिंग मोराळे 


पुढे ते म्हणाले की,  ज्या दिवशी अजित दादा बीडमध्ये आले त्यावेळी मी माझ्या कामगारांना भेटायला गेलो होतो. मी अजित दादा यांच्या दौऱ्यात होतो, मात्र माझ्या मित्राच्या गाडीत गेलो होतो. गाडीचे लोकेशन माध्यमांसमोर सादर केलंय. माझी नार्को टेस्ट केली तरी आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहे.  याचे दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होणार आहे. हे राजकारण सुरू असून धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून रोखण्यासाठी सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही मोराळे यांनी केलाय. माझी गाडी केवळ वाल्मिक कराड यांना सीआयडी ऑफिसला सोडवण्यासाठी होती. आरोप सिद्ध झाला तर माझ्यासारखा कार्यकर्ता भर चौकात फाशी घेईल. मी पंधरा वर्षे बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात काम केले आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेले कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे आरोप फेटाळत हल्लाबोल केला आहे. 


जातीत भांडण लावण्याचे काम सध्या सुरू आहे. ही सर्व खेळी सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्याकडून सुरू आहे. बजरंग सोनवणे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर बिन बुडाचे आरोप करून अन्याय करू नका, असेही शिवलिंग मोराळे म्हणाले.  


हे ही वाचा