मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना केलेल्या कृतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी वाद ओढावून घेतला आहे. प्रफुल पटेल यांनी तमाम महाराष्ट्रासाठी आराध्य आणि वंदनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेला जिरेटोप (Jiretop) नरेंद्र मोदींच्या (PM Modi) डोक्यावर चढवला. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. तसेच विरोधकांनीही प्रफुल पटेलांच्या या कृतीवरुन टीकेची झोड उठवली आहे.


छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमी आणि सामान्य नागरिक अत्यंत दक्ष असतात. जिरेटोप हा शिवाजी महाराजांच्या पेहरावाचा भाग होता. त्यामुळे शिवप्रेमींच्या मनात जिरेटोप म्हणजे शिवराय, असे पक्के समीकरण आहे. त्यामुळेच प्रफुल पटेलांनी हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवण्याची कृती टीकेच्या भोवऱ्यात सापडली आहे.


जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, अशी टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.


वाराणसीमध्ये प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला. मोदी काय छत्रपती झाले आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आपण बदला घ्यायचा, अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.


यामध्ये मोदींचा दोष नाही; भाजप-शिंदे गटाची सारवासारव


या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. ‘यात मोदींचा दोष नाही’, असा बचाव करण्यात आला. असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोणाला मोदींना जिरेटोप घातल्याचा अपमान वाटत असेल तर पुन्हा तसे घडणार नाही. कधी कोणी कोणाला काय घातलं? यात मोदीजींचा काय दोष? यावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही. याचा तपास केला पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले. 


योगी आदित्यनाथांनाही घातला होता जिरेटोप


काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीत आले होते तेव्हादेखील जिरेटोपाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यावेळी योगींचा सत्कार करताना त्यांच्या डोक्यावरही जिरेटोप चढवण्यात आला होता. यावरुन प्रचंड वाद झाला होता. 


आणखी वाचा


पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका