मुंबई : शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिकारी म्हणाणाऱ्या भाजपाच्या माजी खासदार सुजय विखेंना सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्यांनी साईभक्तांचा अपमान केला आहे असल्याची टीका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. शिर्डीतील अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेंच्या घरच्या पैशातून नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले. तसेच मोफत शिक्षण जर द्यायचंच असेल तर सुजय विखेंनी त्यांच्या शिक्षण संस्थांमधून द्यावं, त्यासाठी भरमसाठ डोनेशन आणि शु्ल्क कशासाठी आकारता असा सवालही वर्षा गायकवाड यांनी केला. 


शिर्डीतील मोफत जेवणासाठी राज्यभरातून भिकारी जमा झाल्याचं वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी केलं होतं. त्यावर वर्षा गायकवाडांनी टीका केली. साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेंनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.  


मोफत अन्नछत्राची सुजय विखेंना अडचण काय?


सुजय विखेंच्या वक्तव्याचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "दररोज शिर्डीमध्ये लाखो साईभक्त भक्तीभावाने येत असतात. शिर्डी हे सर्व धर्मियांचे तिर्थक्षेत्र आहे. लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनानंतर दानपेटीत भक्तीभावाने दानही टाकतात. साईभक्तांच्या दानधर्मामुळे दरवर्षी जवळपास 800 कोटी रुपये साई संस्थानकडे जमा होतात. या पैशातून साई देवस्थान भक्तांसाठी विविध योजना राबवित आहे. अन्नछत्र हे सुद्धा त्याच पैशातून सुरु आहे, यात सुजय विखेंना अडचण काय?"


विखेंनी त्यांच्या शिक्षण संस्थेतून मोफत शिक्षण द्यावं


वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, "सुजय विखे आणि त्यांच्या कुटुंबाने वर्षोनुवर्षे सत्तेत राहून कमावलेल्या भ्रष्ट पैशातून अन्नछत्र चालवले जात नाही. मोफत जेवण देण्याऐवजी मोफत शिक्षण द्यावे असे सुजय विखे म्हणत आहेत. तर सुजय विखेंनी त्यांच्या शिक्षण संस्थांतून गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलामुलांना मोफत शिक्षण द्यावे. लाखो रुपयांचे डोनेशन आणि भरमसाठ शिक्षणशुल्क घेऊन शिक्षणाचा धंदा कशाला मांडला आहे?"


साईभक्तांना भिकारी म्हणून त्यांचा अपमान करूनही सुजय विखे हे आपल्या मतावर ठाम असल्याचे उन्मतपणे म्हणत आहेत. यातून त्यांना किती माज आहे हे दिसते. जनता अशा माजोरड्यांचा माज उतरवते. लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगरच्या जनतेने सुजय विखेंना दणका देऊन त्यांची जागा दाखवली आहे. यापुढेही असाच प्रसाद विखे पितापुत्रांना जनता पुन्हा देईल असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.


ही बातमी वाचा: