अहमदनगर (Ahmednagar) : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नागपूरमधील पूर परिस्थितीवरुन (Nagpur Flood) भाजपवर टीका केल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तर दिलं आहे. "ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी नागपूरवर बोलू नये, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. 


आदित्य ठाकरेंची टीका


नागपुरात शनिवारी (23 सप्टेंबर) पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावासामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. शिवाय नागरिकांचं कोट्यवधींचं नुकसान झालं. यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत नागपूर इथल्या पूर परिस्थितीवरुन भाजपवर टीका केली होती. "नागपुरात विकासाच्या नावाखाली जी सिमेंटची जंगलं वाढली आहे त्यामुळे अशी परिस्थिती ओढावली असून, याला काही नेते जबाबदार आहेत," अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. 


'त्यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही'


आदित्य यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. "110 मिलिमीटर पाऊस दोन तासात पडतो, त्यावेळी जगातल्या कुठल्याही शहरात ही परिस्थिती निर्माण होते. नागपुरात तर फार चांगली व्यवस्था आहे. नागपूर शहर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे बदललं आहे. मात्र, ज्यांचं या शहरासाठी शून्य योगदान आहे, त्यात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांचा सामावेश आहे. तर आदित्य ठाकरे यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी एक रुपयाही नागपूर शहरावर खर्च केला नाही. ज्यांनी नागपूरच्या विकासासाठी एक रुपया खर्च केला नाही त्यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही नागपूर बघायला समर्थ आहोत. ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी नागपूरवर बोलू नये," असं बावनकुळे यांनी म्हटलं.


नागपुरात चार तासात  100 मिमीपेक्षा अधिक पाऊस


उपराजधानीत शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तब्बल चार तास शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. अवघ्या चार तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे अनभिज्ञ असलेले नागरिक आणि प्रशासनाची धावपळ उडाली. या पावसामुळे नागपूर जलमय झाले व शहरात हाहाकार माजला. काही परिसरात तब्बल सहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं. शहरातील 10 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले. अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपूरकरांवर आस्मानी संकट कोसळलं होतं.


हेही वाचा


नागपुरात पुरामुळे अनेक घरं आणि दुकानांचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानाची पाहणी