Sujay Vikhe Patil, Ahmednagar : निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' (NCP Sharadchandra Pawar) या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. यावर भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मशाली घ्या तुतारी वाजवा. हवं तर त्यांना नव्या तुतारी देखील घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पहाव लागेल, असे म्हणत विखे पाटलांनी शरद पवार गटाला डिवचलंय. ते अहमदनगर येथे बोलत होते.
सुजय विखे म्हणाले, चिन्ह देणं हा निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतलं गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यत बैलेटवर चिन्ह येत नाही तो पर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, असे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले.
'सेटिंग करून सगळा मलिदा हेच खात होते'
हर घर जल हीच भाजपची निवडणूकीची टॅग लाईन असावी, अशी टीका करत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. सोबत भाजप पदाधिकारी ठेकेदारांना खंडणी मागतात, असा आरोप त्यांनी केला होता. या टीकेला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळातच जलजीवन योजनेचे टेंडर झाले होते. या टेंडरमध्ये सगळे ठेकेदार यांचेच आहे, यांनी त्या काळामध्ये सेटिंग करून सगळा मलिदा हेच खात होते. आता सगळा हिशोब कोलंडल्यामुळे हे आरोप करायला लागले आहे, असं सुजय विखेंनी म्हंटल आहे.
मनोहर जोशींमुळेच राधाकृष्ण विखे शिवसेनेत गेले होते
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनावर सुजय विखेंनी शोक व्यक्त केलाय. मनोहर जोशींमुळेच राधाकृष्ण विखे शिवसेनेत गेले होते त्यांचे आणि विखे कुटुंबियांचे चांगले ऋणानुबंध होते. मनोहर जोशींनी महाराष्ट्रासाठीचे जे स्वप्न पाहिले होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पूर्ण करेल, असं सुजय विखेंनी म्हटलंय.
निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव दिल्यानंतर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाने निवडणूक चिन्ह एका आठवड्यात देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एका आठवड्याच्या आत शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलं आहे. 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर अनावरण सोहळा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या