Ahmednagar News अहमदनगर : हातात काठ्या घेऊन काही तरुणांनी शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील बालमटाकळी येथील परीक्षा केंद्रावर (Examination Centre) ताबा घेत आधी शिक्षकेला धमकावले आणि नंतर खुलेआम विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची घटना समोर आली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझाने ही बातमी दाखवली. परीक्षा मंडळाने ही बाब गांभीर्याने घेऊन या प्रकाराच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली आहे.


ही समिती सर्व बाजूने चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने (Education Department) दिली आहे. याप्रकरणी परीक्षा केंद्रावर येऊन धुडगूस घालत केंद्रावरील शिक्षक - शिक्षिकेला दमदाटी करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी जवळपास 21 जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 


परीक्षा केंद्रावर लाठ्या काठ्यांसह घुसले टवाळखोर


गेल्या महिनाभरापासून शांततेत सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) गालबोट लागले. मंगळवारी दहावीचा अखेरचा भूगोलाचा पेपर सुरू असताना शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर जवळपास दहा ते पंधरा युवक खुलेआम परीक्षा हॉलमध्ये घुसले. त्यांच्या हातात काठा होत्या.


टवाळखोरांची शिक्षिकेला दमबाजी 


त्यामुळे इतर एकाही शिक्षकाने (Teacher) त्यांना प्रतिकार करण्याचे धाडस दाखवले नाही. विशेष म्हणजे केंद्रावर कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. परीक्षा केंद्रावरील एका महिला शिक्षिकेने संबंधित युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मोबाईलमध्ये या युवकांचा व्हिडिओ देखील काढला. यावेळी धुडगूस घालणाऱ्या युवकांनी शिक्षिकेला दमबाजी केली.


समाज माध्यमावर व्हिडीओ व्हायरल 


या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात व्यत्यय आला. दरम्यान हा व्हिडिओ समाज माध्यमावर (Social Media) व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणाबाबत  शिक्षण विभागाने गंभीर दाखल घेतली आहे. श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम रकटे यांच्या फिर्यादीवरून नारायण शितोळे, सुरज भोंगळे, युवराज बनाईत, अजित नागरे, कृष्णा भोंगळे, रितेश बागडे,अभिषेक गरड, दीपक सपकाळ यांच्यासह इतर दहा ते बारा जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराबाबत केंद्र प्रमुखांनी शिक्षण विभागाला माहिती न दिल्याने संबंधित केंद्र प्रमुख आणि इतर दोषींवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.


आणखी वाचा 


SSC Exam 2024 : कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा! बारावीनंतर आता दहावीच्या पेपरलाही कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, भरारी पथक फक्त नावालाच