अहमदनगर : 'आमच्या सारख्या युवकांच्या भविष्यासाठी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे', अशी प्रतिक्रिया हभप शिवलीला पाटील (Shivleela Patil) यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या संपूर्ण राज्यभरातून आंदोलनाची हाक पुकारण्यात आली आहे. तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा देण्यात येतोय. तर यावर अनेक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतयं. यावर शिवलीला पाटील यांनी प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली आहे. 


नेमकं काय म्हणाल्या शिवलीला पाटील?


'ज्यांनी आमच्यासाठी त्यांचा देह पणाला लावला, जे वर बसलेत ते खाली आमच्याकडे पाहून म्हणत असतील "यहा कोई मरे वोटों के लिये, तो कोई मरे नोटो को लिये, गतसिंग, सुखदेव ,शिवाजी महाराज भी सोचते होंगे, हम मरे तो किन हरामजादोंके लिये" अशी सध्याची स्थिती आहे. आमच्या हजारांचा बंडल ज्याच्या खिशात त्याचे नाव दारिद्रय रेषेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कमीत कमी ज्याला गरज आहे त्याला तरी आरक्षण मिळावं', असं शिवलीला पाटील म्हणाल्या आहेत. 


पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आता काही जण म्हणत असतील की तुम्हीच म्हणत होतात आम्हाला आरक्षण नको. आम्ही पाटील, देशमुख आहोत आम्हाला आरक्षणाची काय गरज. पण एखाद्या विद्यार्थ्याला 99 टक्के गुण मिळूनही जर त्या चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळत नसेल तर त्या मुलाच्या बापाला जाऊन विचारा त्याला काय वाटतं ते. जेव्हा चांगले गुण मिळूनही आरक्षण असल्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला संधी मिळते तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना जाऊन विचारा त्यांना काय वाटतं.'


'युवकांच्या भविष्यासाठी आरक्षणाची गरज'


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'ज्याला गरज आहे, त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. तसेच आरक्षण नसल्याने अनेक युवकांची क्षमता असताना त्यांना नोकरी मिळत नाही.'  ज्यांची अशी संधी हुकते त्यांच्या आई-वडिलांना विचारा आरक्षणाचे काय महत्व आहे? असा सवाल देखील शिवलीला यांनी या निमित्ताने विचारला आहे.  'आमच्या सारख्या युवकांच्या भविष्यासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं माझं ठाम मतं आहे',  अशी भूमिका हभप शिवलीला पाटील यांनी व्यक्त केली आहे.


मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर मनोज जरांगे ठाम असून सरकारचा दुसरा जीआर देखील त्यांनी नाकारला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :