अहमदनगर : तीन दिवसीय रामनवमी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच शिर्डीत सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांमध्ये (Sai Baba) मारहाण झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. समाज माध्यमात या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलीसांनी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. भक्तांनी दर्शन घेताना नियमांचं पालन केलं पाहिजे तर सुरक्षा रक्षकांनी अशा प्रसंगी कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती दिली पाहिजे असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून केवळ राज्यातून नव्हे देशभरातील लाखो भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यभरातून अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत आल्या. मुंबईहून शिर्डीत पायी पालखी घेऊन येणाऱ्या अशाच एका साईभक्त आणि साईबाबा संस्थान सुरक्षारक्षकात शुक्रवारी दुपारी मारहाणीची घटना घडलीय. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताने पाच नंबर एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न .मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
या हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर आता साईभक्ताच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाव नोंदवण्यात आला आहे. भक्तांनीसुद्धा दर्शन घेताना, या परिसरात वावरताना नियमांचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांनीसुद्धा असा प्रसंग उदभवल्यास कायदा हातात न घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
यापूर्वीही अनेकदा शिर्डीत सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांच्या वादाच्या घटना घडल्या आहेत. देशविदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याशी आदराने आणि विनम्रपणे बोलायला हवे, यासाठी शेगावच्या धर्तीवर साइसेवक योजना सुद्धा राबविण्यात आली आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत खऱ्या अर्थाने भक्तांनीसुद्धा नियमांचे पालन करण्याबरोबरच साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेणं योग्य नाही.
शिर्डीत तीन दिवसीय राम नवमीची सांगता
साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा करण्यात आला. या तीन दिवसात लाखो भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली. तीन दिवसीय उत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच आज (31 मार्च) सकाळी गुरुस्थान मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. तर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली. दुपारी विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. साईमंदिरात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली.