अहिल्यानगर : शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडामध्ये मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. त्यानुसार आधी कर्मचाऱ्यांची कामाची वेळ पहाटे 4 वाजता सुरू व्हायची. आता ती सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर साई संस्थानाने हे मोठं पाऊल उचललं आहे. तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संस्थानच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. 


शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर पहाटेच्या सुमारास चाकूचा हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील एका आरोपीला अटक झाली असली तरी एक आरोपी अद्यापही फरार आहे.


पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता ड्युटी


साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काकड आरतीमुळे पहाटे लवकर ड्युटीला यावे लागते. सोमवारी (03 फेब्रुवारी) पहाटे देखील एका कर्मचाऱ्याचा ड्युटीवर येताना तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा ड्युटी वरून घरी जाताना खून झाला. या घटनेनंतर साईबाबा संस्थानाने देखील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार, मंगळवार, 04 फेब्रुवारीपासून संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत बदल करण्यात आला आहे.


नव्या वेळेनुसार आता पहाटे 4 वाजता सुरू होणारी ड्युटी 6 वाजता सुरू होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेळेत केलेल्या बदलामुळे त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल. साईबाबा संस्थानने घेतलेल्या या निर्णयाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अधिक माहिती दिली.


मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत


हा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतानाच संस्थांनच्या ज्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांसाठी विमा पॉलिसी व इतर माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी गाडीलकर यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे या घटनेत मृत्यू झालेल्या नितीन शेजुळ याचा सोमवापी लग्नाचा वाढदिवस देखील होता. लग्नाच्या वाढदिवशीच ते आपल्या कुटुंबाला सोडून निघून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


Shirdi Mandir Timetable : कर्मचारी नवीन ड्युटी वेळापत्रक



  • पहिली शिफ्ट - सकाळी 6 ते दुपारी 2 वाजता.

  • दुसरी शिफ्ट - दुपारी 2 ते रात्री 10 वाजता.

  • तिसरी शिफ्ट - रात्री 10 ते सकाळी 6 वाजता.

  • जनरल शिफ्ट - सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता.


ही बातमी वाचा :