अहिल्यानगर : दररोज साईबाबांच्या काकड आरतीने शिर्डीची सकाळ उगवते, मात्र सोमवारची पहाट उगवली ती एका धक्कादायक घटनेने. तासाभराच्या अंतरात झालेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिर्डीत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या सगळ्या घटनेत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे.
साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. पहाटेच्या दरम्यान शिर्डी शहर परिसरातील कर्डोबा नगर, साकुरी शिव आणि श्रीकृष्ण नगर अशा तीन ठिकाणी तीन घटना घडल्या, त्यादेखील चाकू हल्ल्याच्या. या तिन्ही घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
साईबाबा संस्थानमध्ये नोकरीवर असणारे सुभाष घोडे हे पहाटे ड्युटीवर जात असताना कर्डोबा नगर चौक येथे तर नितीन शेजुळ हा कंत्राटी सुरक्षा रक्षक ड्युटी संपवून घरी जात असताना साकुरी शिव याठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप
तिसऱ्या घटनेत खासगी ठिकाणी नोकरी करणारे कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर भागात जिवघेणा हल्ला झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देहरकर यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तीन ठिकाणी झालेल्या या हल्ल्यांच्या घटनेनंतर पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांसह मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी केला. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिर्डी गुन्हेगारीमुक्त करणार, सुजय विखेंचा निर्धार
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी खासदार सुजय विखे हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रूग्णालयात धाव घेत नातेवाईकांना धिर देण्याचा प्रयत्न केला. आरोपीला लवकर जेरबंद केलं जाईल याबाबत त्यांना आश्वस्त केलं.
काही दिवसांपूर्वीच सुजय विखे यांनी शिर्डीतील गुन्हेगारी वाढण्यास मोफत जेवण कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं .त्याचा पुनरूच्चार करत पुढच्या दहा दिवसात शिर्डीतील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर 8 फेब्रुवारी रोजी राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करण्याचा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला.
पोलिसांचा हलगर्जीपणा
या हत्याकांडामुळे शिर्डी हादरून गेली असून दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी मोडीत काढणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. पहाटेच्या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांनी ही घटना अपघात असल्याचं सांगत घटनास्थळी येण्यासाठी सकाळचे 7 वाजवले. त्यामुळे शिर्डी पोलिस फक्त व्हीआयपींच्या दिमतीला आहेत का असा संतप्त सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी उपस्थित केला. तर शिर्डी ग्रामस्थांनी देखील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिस अधीक्षक राकेश ओला हे देखील शिर्डीत दाखल झाले आणि त्यांनी मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतली. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती त्यांनी देताना घटनेचं मोटिव्ह अद्यापही समोर आलं नसल्याचे स्पष्ट केलं आहे. शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांचे चौकशी करून कारवाई करण्याचं आदेश देखील दिले आहेत.
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत यापूर्वी देखील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पंजाब राज्यातील मोस्ट वॉन्टेड अतिरेकी देखील शिर्डीतच सापडला होता. त्यानंतर शिर्डीत अनेक कारवाया सुद्धा करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा एकदा शिर्डीत गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून गुन्हेगारांना असणारा राजाश्रय थांबल्याशिवाय गुन्हेगारीचा बिमोड होणार नाही हे मात्र नक्की.
ही बातमी वाचा: