अहमदनगर गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान भक्तांनी साईंच्या (Saiababa Mandir) चरणी सहा कोटी 26 लाखांचं दान केलंय. तीन दिवसाच्या उत्सवात भाविकांनी (Shirdi)  कोट्यवधींचं दान केलंय. हुंडीमध्ये 2 कोटी 53  लाख, देणगी काऊंटरला 1 कोटी 19 लाख असे 6 कोटी 25 लाखांची रक्कम दान करण्यात आलीये. तर 8 लाख रुपयांचं सोनं आणि 2 लाख 7 हजारांची चांदी दान कऱण्यात आलीये. तर गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान दोन लाख भाविकांनी दर्शन घेतलंय. तर 205 भाविकांनी रक्तदान केलंय. 


शिर्डीच्या साईबाबा मंदिरात  गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे. गुरूपौर्णिमा उत्सवात (Gurupuarnima) साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात येत आहे. उत्सवाच्या तीन दिवसांत सहा कोटी 25  लाख 98 हजार 344  इतकी  दान जमा झाले आहे. यामध्ये रोख  स्‍वरुपात 2 कोटी 53 लाख 29 हजार 575  दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली. तर देणगी काऊंटर 1 कोटी 19 लाख 79  हजार 190 रुपये,  सशुल्‍क पास 46 लाख 73 हजार 400, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 1 कोटी 95 लाख 13 हजार 884 रुपये,  सोने 8 लाख 31 हजार 388 आणि चांदी  2 लाख, 70 हजार 907  यांचा समावेश आहे.


 गुरूपौर्णिमा उत्‍सव  कालावधीत साधारणतः दोन लाखहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.  उत्‍सव कालावधीमध्‍ये  साईप्रसादालयाद्वारे सुमारे 1 लाख 91 हजार 349 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेत 1 लाख 96 हजार 200 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत 62 लाख 31 हजार 125 रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले. उत्‍सवा दरम्‍यान संस्‍थान परिसरात उभारण्‍यात आलेल्‍या प्रथमोपचार केंद्रात साधारण 5810 साईभक्‍तांनी उपचार घेतले तसेच 205 साईभक्‍तांनी रक्‍तदान केले  असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले


समाजोपयोगी कामासाठी दानाचा उपयोग


दरम्यान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी आणि समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात नि:शुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते.