नाशिक : बाळासाहेब थोरातांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केल्यानंतत आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडा असं लोक म्हणू लागले आहेत असा आरोप संग्रामबापू भंडारे यांनी केला. आपली गाडी फोडायची तर फोडा, पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला केला तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. संग्रामबापू भंडारे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांना हा इशारा दिला.
संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्या नवीन व्हिडीओत बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा व्हिडीओ समाविष्ट केला. बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं. त्यानंतरच आळंदी मधील महाराजांच्या गाड्या फोडण्याची भाषा लोक करू लागल्याचा आरोप संग्रामबापू भंडारे यांनी केला.
माझी गाडी फोडायची तर फोडा, मात्र कुठल्याही धर्म प्रचारकावर हल्ला केला तर मला संग्रामबापू भंडारे मधला बापू हा शब्द काढून टाकावा लागेल आणि संग्राम भंडारे व्हावे लागेल, असा इशाराच त्यांनी बाळासाहेब थोरात यांना दिला.
Balasaheb Thorat Vs Sangram Bhandare : प्रकरण नेमकं काय?
संग्रामबापू भंडारे हे कीर्तनाचे काम करतात. 16 ऑगस्ट रोजी संगमनेरच्या घुलेवाडीत त्यांचे कीर्तन सुरू असताना तिथे शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. कीर्तनाच्या कार्यक्रमात संग्रामबापू भंडारे यांनी राजकीय भाष्य केल्याचा आरोप नितीन गायकवाड याने केला. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला.
गोंधळ घालणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते होते असा महायुतीचा आरोप आहे. यावेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संग्रामबापू भंडारे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी संगमनेर पोलिसात तक्रारही केली.
Sangram Bhandare Video : नथूराम गोडसेचे समर्थन
दरम्यान, थोरातांना धमकीवजा इशारा देताना भंडारेंनी थेट महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला आखाड्यात उतरवलं. आपल्याला नथूराम गोडसे व्हावं लागेल असं ते म्हणाले. तर बाळासाहेब थोरातांचा विधानसभेत पराभव करणारे शिवसेनेचे अमोल खताळ आणि भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले कीर्तनकार भंडारेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते.
Balasaheb Thorat Rally Video : बाळासाहेब थोरातांनी व्हिडीओच दाखवले
कीर्तनावरून झालेल्या राड्यानंतर संगमनेरमध्ये राजकीय वाद उफाळून आला. संग्रामबापू भंडारे यांच्या वक्तव्याचा आणि धमकीचा निषेध करण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे देखील मोर्चात सहभागी झाले होते. तत्वाकरिता आणि विचाराकरिता मरण्याची तयारी असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी यावेळी केलं.
शिवाजी महाराज आणि अफजलखान प्रकरणावर भाष्य करताना आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संग्रामबापू भंडारे यांनी केला होता. पण हा आरोप खोटा असल्याचं सांगत बाळासाहेब थोरांनी त्या कीर्तनाचा व्हिडीओच सर्वांसमोर आणला. राजकीय भाष्य करताना कीर्तनावर बोला असं एकाने मागणी केल्यानंतर हा राडा झाल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं. तसेच स्वतःला कीर्तनकार म्हणायचे आणि हिंसा करणाऱ्या नथूराम गोडसेचे समर्थन करायचे, त्या माध्यमातून तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरातांनी केला होता.