Shirdi Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 


काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यात ठाकरे गटाकडून शिर्डीसाठी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता शिंदे गटाने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लढतीत कोणाचा विजय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे लढत होणार


अनुसूचित जातींसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) राखीव आहे.  2009 साली हा मतदारसंघ राखीव झाला होता. त्यापूर्वी काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघावर होतं. मात्र 2009 नंतर सातत्याने शिवसेनेच्या उमेदवाराने या ठिकाणी विजय मिळवला आहे. 2014 साली भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची वाट धरली आणि त्यावेळी सदाशिव लोखंडेंनी (Sadashiv Lokhande) भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव करत अवघ्या 17 दिवसात खासदारकी मिळवली होती. आता पुन्हा एकदा 2024 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत होणार आहे.  


सदाशिव लोखंडेंचे सूचक वक्तव्य


खासदार सदाशिव लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, आमच्या नेत्यांनी मला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचे नेते अधिकृत घोषणा करतीलच. मात्र त्यांनीच आम्हाला आदेश दिलेत, असे त्यांनी म्हटले होते. 


लोकसभेसाठी आतापर्यंत कुणाचे किती उमदेवार?


राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजपने सर्वाधिक 24 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर काँग्रेसने 12, शिवसेना ठाकरे गटाने 17 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 2 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याशिवाय प्रकाश आंबडेकर यांनी नऊ  उमेदवारांची यादी जाहीर केली.


शिवसेना शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे 



  • मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे

  • कोल्हापूर - संजय मंडलिक

  • शिर्डी - सदाशिव लोखंडे

  • बुलढाणा - प्रतापराव जाधव 

  • हिंगोली - हेमंत पाटील

  • मावळ - श्रीरंग बारणे

  • रामटेक - राजू पारवे

  • हातकणंगले - धैर्यशील माने


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, हिंगोलीतून पुन्हा हेमंत पाटील, तर मुंबईतून राहुल शेवाळेंसह आठ उमेदवारांची घोषणा


Shiv Sena UBT Canditates: शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?