Rohit Pawar : शिर्डी (Shirdi) येथे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पन्नास भिक्षेकरींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पन्नास भिक्षेकरूंपैंकी चार जणांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात (Ahilyanagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या चार भिक्षेकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही मोहीम प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. या मृत्यूबाबत राजकीय क्षेत्रातून टीका होत आहे. आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या समाजमाध्यमावर ही घटना अमानवीय असल्याचं म्हटलं असून या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबरोबरच सरकारच्या यंत्रणामध्ये ठोकशाही पाहायला मिळत असून हिटलर आणि नाझीशाहीप्रमाणे वागत असल्याचं म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या 'एक्स' सोशल माध्यमावर पोस्ट करून सरकार आणि सरकारी यंत्रणावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की, शिर्डीत भिक्षुक असल्याच्या आरोपाखाली 51 जणांना पकडून तुरुंगात डांबले, त्यात काहींची तब्येत बिघडली असता त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांना पाणी देण्यात आले नाही, एकाच रूममध्ये बांधून ठेवले अशा अनेक अमानवी गोष्टी समोर येत आहेत.
दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या जखमा ओल्या असतानाच पुन्हा कोठडीत असा प्रकार घडल्याने राज्यात ठोकशाही सुरू झाली का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. हिटलरच्या नाझीशाहीप्रमाणे इथल्या यंत्रणा वागायला लागल्या तर सामान्य माणसाचं रक्षण कोण करणार? सरकारने या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
आणखी वाचा