अहमदनगर : तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचं विखे म्हणाले आहेत. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 


यावेळी बोलतांना विखें म्हणाले की, "तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा, तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवान परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असा इशारा" राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. 


दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे


याचवेळी पुढे बोलतांना विखे पाटील म्हणाले की, "मनोज जरांगे यांना समाजाने आदराच स्थान दिलं होतं. मात्र,  मी म्हणजे मराठा समाज हे जरांगे यांनी डोक्यातून काढले पाहिजे. तसेच त्यांनी आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळणं बंद केलं पाहिजे. फडणवीस यांच्यावर केलेले विधान हे कोणत्याही शीष्टाचारला धरून नाही. सरकारने- सभागृहाने आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे, जिआर काढले आहे. मात्र, हे तुम्हाला मान्य नाही. त्यामुळं तुम्ही म्हणजे समाज नाही. आंदोलनासाठी समाजाने पाठबळ दिले, मात्र तुम्हाला स्वतःच हित सध्या करायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुतारी वाजवता की हातात मशाल घेतलेली आहे. दुर्दैवाने जेव्हा घटना घडली तेव्हा जाणता राजा जातात, उद्धव ठाकरे जातात.  त्यामुळे हे प्री प्लॅन होत असं समोर येत असून, दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटले आहे.


राजेंद्र पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर...


मला शरद पवारांनी राजकारणात येऊ दिलं नाही म्हणून अजित पवारांचा मार्ग सुकर झाला असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आले. याबाबत बोलतांना राधाकृष्ण विखेंनी म्हटले आहे की, "मी त्यांचं विधान ऐकलं नाही. मात्र, रोहित पवारांना तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करू नको जशी अजित दादांची फसवणूक झाली. तशी तुझी देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचे असेल असे मला वाटते असं विखेंनी म्हंटल आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Radhakrishna Vikhe : '...तर मी राजकारणाचा संन्यास घेऊन टाकेन', राधाकृष्ण विखेंचे संजय राऊतांना चॅलेंज