अहमदनगर: लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे नगरचे राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्यातील राजकीय वादाला धार येताना दिसत आहे. निलेश लंके यांच्या पत्नी या नगरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यासाठी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. पण स्वत: काढलेल्या या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला मात्र त्यांनी उपस्थिती लावली नसल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या 'शिवस्वराज्य' यात्रेची आज सांगता झाली. अहमदनगरच्या शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेची सांगता झाली. विशेष म्हणजे ज्यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली ते आमदार निलेश लंके हेच या यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला गैरहजर राहिले.
नगरच्या शक्कर चौक ते माळीवाडा बस स्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या युवक-युवतींनी सहभाग घेतला. आमदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी या मिरवणुकीवर 25 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सांगता करण्यात आली.
लोकसभा लढवणार, राणी लंके यांचा पुनरूच्चार
भाजप खासदार सुजय विखेंनी आपल्या लोकसभा मतदारसंघात साखर वाटप केली, तर दुसरीकडे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी निलेश लंके यांनी लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले. दरम्यान यात्रेच्या समारोप प्रसंगी राणी लंके यांनी पुन्हा एकदा आम्ही लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा पुरुच्चार केला. मात्र आमदार निलेश लंके हेच या समारोप कार्यक्रमाला हजर राहिले नसल्याचे चर्चेला उधाण आले होते.
महायुतीच्या मेळाव्यालाही गैरहजर
भाजपचे खा. सुजय विखेंच्या विरोधात दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना महायुतीच्या नगरमध्ये होणाऱ्या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे लंके महायुतीच्या व्यासपीठावर येणार की नाही? याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र महायुतीच्या मेळाव्याला निलेश लंके उपस्थित राहिले नाहीत.
भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. खासदार विखे यांनी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मतदारसंघात साखर-डाळ वाटप सुरू केले आहे. तर आमदार लंके यांनी देखील शिवस्वराज्य यात्रा सुरू करून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
ही बातमी वाचा: