Nilesh Lanke : मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं. पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे म्हणत राजीनाम्याची घोषणा करताना पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे डोळे पाणावले.
सुपा येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निलेश लंके यांनी हा निर्णय घेतला आहे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असून राजीनामा देताना ते भावूक झाल्याचे दिसून आले. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे (Sujay VIkhe) आणि आ. निलेश लंके यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
निलेश लंकेंची विखे पाटलांवर टीका
अजित दादांनी पहाटेची शपथ घेतली नंतर दादांनी दुपारी शपथ घेतली. त्यावेळी अजित पवारांसारखा माणूस राजकारणात असावा म्हणून दादांसोबत गेलो. महायुतीच्या काळात जिल्ह्यातील काहींना मंत्रिपद मिळाली. पालकमंत्री यांनी तर निलेश लंके यांना संपवण्याचा घाट घातला. त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात चांगलं काम करण्यापेक्षा वाईटच काम केलं. आपल्या कामाला निधी मिळाला तर अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला, अशी टीका त्यांनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली. आपल्याला जिरवा जिरवी कारायला कुणी आमदार केलं नाही. माझे विरोधक देखील म्हणतात की, निलेश लंके यांनी आम्हाला कधी त्रास दिला नाही, असेही त्यांनी म्हटले.
अजित दादांनी राजकारणात खूप मदत केली
अजित पवार यांच्याबद्दल आपलं मतं आजही चांगलं आहे आणि उद्याही चांगलं राहील. दादांनी राजकारणात मला खूप मदत केली. आपला देश जातीपातीवर बोलायला लागला, आपल्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी मी शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य ठेवले. या महानाट्याबाबत एका पोलिसांनी आपलं मत व्यक्त केलं तर विखेंनी त्या पोलिसाला निलंबित केले. रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात? अशीही टीका त्यांनी यावेळी विखेंवर केली आहे. आमच्या एका कार्यकर्त्यांनी पैज लावली होती की खासदारांचा एक फोन कॉल दाखवा हजार रुपये मिळवा. आता तोंड लपवायची वेळ त्यांच्यावर आली असल्याची टीका त्यांनी यावेळी सुजय विखे पाटलांवर केली आहे.
आणखी वाचा