Nilesh Lanke अहमदनगर : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहे. गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर सात दिवसांत कारवाई करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण (Protest) करण्यात येईल, अशा इशारा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिला आहे.


खासदार निलेश लंके यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे. खासदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख झाली आहे. शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन क्लब, अवैध वाळू उपसा, गुटखा, अवैध दारू विक्री, मटका, चंदन तस्करी, बिंगो यांसारखे व्यवसाय सुरू आहेत. 


पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा 


स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे त्याला अभय आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ते वसूल करत सामान्य लोकांना वेठीस धरतात. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सराफ व्यापाऱ्यांकडून पैसे उकळतात, असे गंभीर आरोप निलेश लंके यांनी केलेत. गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश करावेत. कारवाई न झाल्यास पुराव्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे खा. निलेश लंके यांनी निवेदनात म्हटले आहे. 


निलेश लंकेंचा मोर्चा पोलीस अधीक्षकांकडे 


दरम्यान, निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केले होते. दुध आणि कांदा दरावरून निलेश लंके यांनी तीन दिवस आंदोलन केले होते. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर निलेश लंके यांनी आपले आंदोलन स्थगित केले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयानंतर निलेश लंके यांनी आपला मोर्चा पोलीस अधीक्षकांकडे वळविला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने त्यांना मदत न केल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी तर ही आंदोलनाची मालिका सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


आणखी वाचा 


Nilesh Lanke : पूजा खेडकरांनी असं वागायला नको होतं, वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घ्यावी: निलेश लंके