Continues below advertisement

अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) सध्या त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेने चर्चेत आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा आपला पक्ष असल्याचे पक्षाचे नेते अजित पवार (Ajit pawar) वारंवार जाहीर सभांमधून सांगत असले तरीही संग्राम जगताप हे अजित पवारांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर कोणत्याही प्रखर भूमिका मांडू नयेत, असे सांगत अजित पवारांनी नाव न घेता छगन भुजबळ यांचेही कान टोचले होते. त्यानंतर, भुजबळ यांनीही आप आरक्षणाच्या बाबतीत आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, असे स्पष्ट केले, आणि आता संग्राम जगताप हेही दादांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.

अहिल्यानगरचे तत्कालीन शिवसेना आमदार अनिल राठोड यांनी 25 वर्ष हिंदुत्ववाच्या मुद्यावर आपला अहिल्यानगर (त्यावेळचा अहमदनगर) शहर विधानसभा मतदारसंघ टिकून ठेवला, त्यांच्या निधनानंतर अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांची पोकळी निर्माण झाली ती पोकळी संग्राम जगताप सध्या भरून काढत आहे. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, लोणी प्रवरा भागात आपले राजकारण करतात. नगर शहरात त्यांचा जम कधी बसला नाही, राज्याचे काँग्रेसचे नेते म्हणून महाराष्ट्रभर फिरणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनीही संगमनेर पलिकडे नगर शहरत आपल्या दबदबा निर्माण केला नाही. मात्र, संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने त्यांचा दबदबा केवळ जिल्ह्यातच नाही तर राज्यात होताना दिसत आहे. सध्या संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डले हेही केवळ राहुरी विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करून आहेत. त्यामुळे संग्राम जगताप याना अहिल्यानगरचे अवकाश खुले झाले आहे.

Continues below advertisement

नुकत्याच पार पडलेला विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सहभागी झालेल्या संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने कमी मतदान केले. एकेकाळी मुस्लिम समाज त्यांना भरभर मतदान करायचा. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरवाला, मुस्लिम बहुल भागात विकासकामे करून ही मतदान मिळाले नसल्याने ती सल संग्राम जगताप यांच्या मनात कायम असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळेच, हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्याची रणनीती संग्राम जगताप यांनी आखली आहे. गेल्या तीन टर्म आमदार असणाऱ्या संग्राम जगताप प्रखर हिंदुत्ववादी विचाराकडे झुकले असले तरीही ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी आहे. तर, अजित पवारांनाही ते परवडणारे नाही. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या संग्राम जगताप यांना भाजपसोबत जायचे असेल तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सध्या आहे त्याच परिस्थितीतच अजित पवार आणि संग्राम जगताप या दोघांना काम करावे लागणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांन अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची धुरा आपल्या हाती घेतली आहे, त्यामुळे संग्राम जगताप यांच्या भूमिकेला बाहेरून पाठींबा विखे पाटील देतील पण संग्राम जगताप यांच्यासारखा नव्या दमाचा आणि आक्रमक चेहरा आपल्या पक्षात घेऊन विखे पाटील स्वतःची कोंडी करतील का? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांच्या भूमिकामुळे हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होऊन त्यांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या संग्राम जगताप यांना वरचढ ठरेल असे राजकय नेतृत्व अहिल्यानगर शहरात दिसत नसल्याने त्या संधीचा संग्राम जगताप पुरेपूर फायदा घेत आहेत.

जगताप यांच्या पाठिंब्यानेच 2018 साली भाजपचा महापौर

आमदार संग्राम जगताप यांनी पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचारांशी हातमिळवणी केलीय, तर असेही नाही. शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरीही 2018 च्या अहिल्यानगर (त्यावेळच्या अहमदनगर) मनपा निवडणुकीनंतर संग्राम जगताप यांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला पाठींबा देत भाजापचे बाबासाहेब वाकळे याना महापौर केले होते. त्यानंतर, शिवसेनच्या रोहिणी शेंडगे यांना महापौर केले होते. त्यावेळी राष्ट्रवादीत शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. मात्र, संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी पक्षाचा महापौर केला. त्यावेळी शरद पवार हे संग्राम जगताप यांच्यावर पक्षीय कारवाई करतील असं वाटत असताना त्यावेळीही तशी कारवाई झाली नाही. दरम्यान 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी संग्राम जगताप आतापासूनच आपले ग्राऊंड तयार करत असून त्यांच्यापासून दूर गेलेल्या मुस्लिम मतांची भर ते हिंदू मतांनी भरून काढण्यासाठी आतापासूनच तयारी करत आहेत. अजित पवार काय सूचना करणार आणि संग्राम जगताप किती ऐकून घेतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

अजित पवारांचा दम, संग्राम जगतापांच्या डोक्यावरील भगवी टोपी गायब; माध्यमांच्या प्रश्नावर काय म्हणाले आमदार?