Anna Hazare : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. येत्या अधिवेशनामध्ये लोकायुक्त कायदा (Lokayuktas Act) संमत करण्यासंदर्भामध्ये अण्णा हजारे यांच्याशी विखे पाटील यांनी चर्चा केली आहे. लोकायुक्त सक्षम करण्यासाठी जी समिती नेमण्यात आलेली आहे, त्या समितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील आहेत. विधानसभेमध्ये हा कायदा मंजूर झाला असून, सध्या विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी आहे. सुधारित कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील घेण्याबाबत चर्चा झाल्याचं विषय विखे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधेयक मंजूर न झाल्यास अध्यादेश काढण्यासंदर्भात देखील सरकार विचार करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा कायदा विधानसभेमध्ये मंजूर झाला पण...


लोकायुक्त कायद्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत नसून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा कायदा विधानसभेमध्ये मंजूर झाला आहे. मात्र विधान परिषदेमध्ये संख्याबळ कमी असल्याने विरोधकांच्या विरोधामुळं हा कायदा तिथे संमत झाला नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


ठाकरे सरकार लोकायुक्त विधेयकाबाबत फार गंभीर नव्हते : विखे पाटील 


मागील अडीच वर्षाच्या सरकारमध्ये लोकायुक्त विधेयक रखडल्याचा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ठाकरे सरकार लोकायुक्त विधेयकाबाबत फार गंभीर नसल्याचे सांगत त्याबाबत मी जास्त बोलणार नाही. मात्र, हे सरकार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ज्या सूचना आहेत त्यावर गांभीर्याने विचार करणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.


विधेयकाबाबत सरकारकडून आश्वासन


लोकायुक्त विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. भेटीनंतर अण्णा हजारे यांना हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मंजूर करण्याबाबतचा शब्द विखे पाटील यांनी दिला असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं. या विधेयकाबाबत अनेक आश्वासने दिली गेली आहेत. आता ठोस भूमिका घेऊन काहीतरी करा असं आपण विखे यांना सांगितल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितलं. सरकारवर विश्वास ठेवायला हवा असंही अण्णा हजारे म्हणाले. 


निवडणुका समोर ठेवून राजस्थानमध्ये जिल्हा विभाजनाचा निर्णय


राजस्थानमध्ये निवडणुका समोर ठेवून जिल्हा विभाजनाचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. राजस्थान 50 जिल्ह्यांचे राज्य झाले आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी जिल्हा विभाजनाची मागणी होत आहे. याबाबत राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली. राजस्थानमधील येथील काँग्रेस सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. हे अपयश झाकण्यासाठी वेगळी चर्चा घडून आणण्यासाठी असे लोकप्रिय निर्णय घेत असल्याचे  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राजस्थान सारखी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. या ठिकाणी काही जिल्ह्यांच्या विभाजनाचा प्रश्न आहे. मात्र, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ असे देखील विखे पाटील म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: