अहमदनगर : मोहटादेवीकडे जाणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी काही बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर आमदार निलेश लंके यांच्या पत्नीचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप खासदार सुजय विखेंसोबत (Sujay Vikhe) राणीताई लंके (Ranitai Lanke) यांच्यावर देखील लक्ष्य केंद्रीत केले जात आहे, अशा जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत. यावर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मी ते बॅनर पाहिले नाहीत. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ते बॅनर लावले आहेत.आता कार्यकर्त्यांच्या डोक्यात काय आहे, हे मी नाही सांगू शकत. शेवटी एका कुटुंबात दोन मतप्रवाह असू शकतात.'
मला वरिष्ठांकडून आग्रह केला जात होता - निलेश लंके
आमदार निलेश लंके हे भविष्यात लोकसभा निवडणुका लढवू शकतील अशा चर्चा वारंवार होत असतात. यावर देखील आमदार निलेश लंके यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी वरिष्ठांकडून मला तसा आग्रह केला जात होता. त्यामुळे मी लोकसभा मतदारसंघांची चाचपणी देखील करत होतो. पण त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आलं. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकांबाबत माझी वरिष्ठांसोबत चर्चा झाली नाही. वरिष्ठांनी जबाबदारी दिली तर ती आम्ही पार पाडू असंही यावेळी निलेश लंके यांनी म्हटलं आहे.'
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे निलेश लंके यांचा चेहरा लोकसभा निवडणुकांमध्ये दिसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
'या' रस्त्यासाठी करणार पाठपुरावा - निलेश लंके
अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यासाठी आमदार निलेश लंके यांनी चार दिवस उपोषण केले होते. त्यावेळी नगर पाथर्डी रस्त्याचं काम हे पूर्ण झालं मात्र इतर रस्त्यांचे काम हे अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबात देखील आमदार निलेश लंके यांना विचारणा करण्यात आली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मी ज्या वेळेला उपोषण केले त्यावेळेली माझं पहिलं प्राधान्य नगर - पाथर्डी रस्ता होता. त्या रस्त्याचे काम झाले. त्यामुळे या रस्त्यामुळे ज्या साडेचारशे लोकांचे बळी गेलेत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. पण आता मला नगर- मनमाडसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.'
हेही वाचा :
Dhananjay Munde : मला शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, ..तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही : कृषीमंत्री