Dhananjay Munde : दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना आगरी पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. जर दिवाळीच्यापूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये आज कृषीच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. मला शेतकऱ्यांच्या वेदना कळतात असेही मुंडे म्हणाले.
विरोधकांवर विश्वास ठेवू नका
पिक विम्याच्या बाबतीमध्ये विरोधक मोठ मोठ्या सभा घेतील अफवा पसरवण्याचं काम करतील. मात्र, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या वेदना मला चांगल्या कळतात, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना देखील टोला लगावला.
40 लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरच वाटप
बीडमध्ये 212 लाभार्थ्यांना शासनाच्या कृषी योजनेत विविध प्रकारचे लाभ मिळाले आहेत. यापैकी 40 लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरच वाटप करण्यात आलं. बदलते हवामान आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे त्याचबरोबर यांत्रिक शेती देखील प्राधान्याने केली पाहिजे असे धनंजय मुंडे म्हणाले. शेतीच्या यांत्रिकीकरणाला अधिक पाठबळ देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
धनंजय मुंडे यांनी चालवला ट्रॅक्टर
दरम्यान, लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करत असताना धनंजय मुंडे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला. धनंजय मुंडे यांच्या हस्ते 40 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचा वाटप करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे हे लहान असताना त्यांच्याकडे ज्या कंपनीचा ट्रॅक्टर होता, आज त्याच कंपनीचा ट्रॅक्टर धनंजय मुंडे यांनी पहिला आणि चालवण्याचा आनंद घेतला..
शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पिक विमा रक्कम देण्यात येते
ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार पीक लागवडीपासून 21 ते 25 दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पिक विमा रक्कम देण्यात येते. म्हणजे ज्या मंडळामध्ये 21 ते 25 दिवस पाऊस पडलेला नाही त्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना आगरी पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत असल्याचे मुंडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: