कोपरगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ (Kopargaon Assembly Constituency) चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचे तिकीट निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघातून भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) इच्छुक आहेत. यामुळे महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांची बैठक झाली होती. कोपरगावचा पेच सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरल्याचे दिसून आले. कोल्हे कुटुंबियांची मनधरणी करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
कोल्हे कुटुंबीयांनी भाजपसोबतच राहावे, वरिष्ठांकडून प्रयत्न
यानंतर स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीसाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. कोपरगावचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी कोल्हे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. कोल्हे कुटुंबीयांनी भाजपसोबतच राहावे यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोपरगावमध्ये कोल्हे आणि काळे पारंपरिक राजकीय विरोधक
महायुतीत कोपरगावची जागा अजित पवार गटाकडे गेल्याने कोल्हे यांची राजकीय अडचण निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे अजित पवार गटाचे असल्याने त्यांना तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कोपरगावमध्ये कोल्हे आणि काळे पारंपरिक राजकीय विरोधक आहे. तर स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. निवडणूक लढवण्यासाठी कोल्हे कुटुंबीय राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हे पक्षांतर करण्याच्या चर्चेमुळे भाजप हायकामांडकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. कोपरगावचा पेच सोडवण्यात भाजप नेत्यांना यश येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यामुळे कोल्हेंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
विवेक कोल्हेंनी घेतली होती शरद पवारांची भेट
दरम्यान, भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. विवेक कोल्हे आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता. शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली. त्यानंतर विवेक कोल्हे हे पवारांच्या गाडीतून रवाना झाले होते. यामुळे विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा चर्चा कोपरगावमध्ये रंगल्या होत्या.
आणखी वाचा
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस