अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. अनेक पक्षांकडून सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यातच आता पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.    


विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढताना दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात देखील जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ उडाल्याने भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.


भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर


आज पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने हे या मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.  इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे. 


हर्षदा काकडेंचे मोठे शक्तिप्रदर्शन


शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी शेवगावच्या बोधेगाव येथे "संकल्प विजयाचा" मेळावा घेत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. कधीकाळी भाजपमध्येच असलेल्या हर्षदा काकडे सध्या भाजपच्याच विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या त्या जोरदार तयारी करत असून मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. कोणत्या पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तरी मला जनतेने उमेदवारी दिली आहे. मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स